|| महेश बोकडे

अतिरिक्त कारभार देऊन वेळ काढण्याचा प्रयत्न

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित उपराजधानीत मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद ही महाविद्यालये व त्याच्याशी संलग्नित बरेच महाविद्यालये व अभ्यासक्रम आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी सर्व महाविद्यालयांत वसतिगृहांची सोय असली तरी तेथे आजपर्यंत गृहपालाचे पदच निर्माण करण्यात आले नाही.  येथे अनेकदा रात्री विद्यार्थ्यांच्या पाटर्य़ा रंगत असून काही विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडतात.

शासनाच्या निकषानुसार, प्रत्येक शैक्षणिक संस्थेत निवासी गृहपाल असायला हवा. मेडिकलमध्ये नऊ ते दहा वसतिगृहाच्या इमारती आहेत. मेयोमध्येही विद्यार्थ्यांसाठी २९६ खोल्या आहेत. मात्र, दोन्ही महाविद्यालयांमध्ये एकाही वसतिगृहात कायम निवासी गृहपाल नाही. मेडिकलमध्ये परिचर्या महाविद्यालय, व्यवसायोपचार व भौतिकोपचार शाळा, ओटीपीटीचे विविध अभ्यासक्रमही चालतात. या विद्यार्थ्यांसाठीही येथे वसतिगृह आहेत. परंतु  गृहपाल नाही.

मेयोतही परिचर्या महाविद्यालयासह इतरही अभ्यासक्रम चालतात. परंतु तेथेही स्थिती सारखीच आहे. आयुर्वेद महाविद्यालय व दंत महाविद्यालयातही स्थिती अशीच आहे.

मेडिकलमध्ये मुलांच्या वसतिगहाचे मुख्य गृहपाल म्हणून सहयोगी प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे तर मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी डॉ. भिसे आणि डॉ. प्रगती राठोड यांच्याकडे आहे. मात्र यांच्यापैकी कोणीही विद्यार्थ्यांच्या वसतिगृह परिसरात कुटुंबासह राहत नाहीत. येथील सर्व डॉक्टर सेवा संपल्यावर आपल्या घरी निघून जातात. यानंतर विद्यार्थ्यांचा मनमौजी कारभार चालतो. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या तरच प्रशासन हलते. त्यातच अतिरिक्त कारभार असलेल्या अधिकाऱ्यांवर  वसतिगृहातील निरीक्षणासह इतर कामाचीही जबाबदारी आहे.

मेडिकल, मेयोत साडेतीन हजार विद्यार्थी

मेडिकलमध्ये एमबीबीएसच्या प्रत्येक वर्षांला २५० यानुसार अंतिम वर्षांपर्यंतचे एकूण १००० विद्यार्थी शिकतात. याशिवाय येथे २०० आंतरवासी, १६० व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, पदव्युत्तर, परिचारिका अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमाचे असे एकूण सुमारे अडीच हजार विद्यार्थी  शिकत आहेत. त्यातील बहुतांश जणांच्या राहण्याची व्यवस्था मेडिकल परिसरातील वसतिगृहात  आहे. दंतच्या विद्यार्थ्यांचीही सोय त्यांच्या स्वतंत्र वसतिगृहात आहे.  मेयोतही पदवी, पदव्युत्तर व इतर अशा एकूण साडेबाराशे  विद्यार्थी शिकतात. पैकी २९६ खोल्यांत अनेकांची राहण्याची सोय केली जाते.

देशभऱ्यातील मुले उपराजधानीच्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येतात. येथे विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहाच्या खोल्याही कमी आहेत. त्यातच येथे गृहपाल नसल्याने पालकांना चिंता सतावते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ही पदे मंजूर व्हायला हवी. न झाल्यास इंटक आंदोलन करेल. – त्रिशरण सहारे, अध्यक्ष, इंटक .