मुख्यमंत्र्यांकडून व्हिडीओ लिंकद्वारे उद्घाटन, दुपारनंतर प्रवासी सेवेचाही प्रारंभ

नागपूर : बहुप्रतिक्षित लोकमान्यनगर ते बर्डी या अ‍ॅक्वामार्गावर मेट्रोची सेवा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. सकाळी १०.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून व्हिडीओ लिंकद्वारे या सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रम सुभाषनगर स्थानकावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री दुर्गा शंकर मिश्रा, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, युवक व क्रीडामंत्री सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सर्व आमदार व खासदार कृपाल तुमाने यांच्यासह महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन आटोपल्यावर दुपारी दोननंतर या मार्गावर प्रवासी सेवाही सुरू होणार असून २९ जानेवारी पासून सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान पूर्ण क्षमतेने मेट्रो धावणार आहे. प्रत्येकी ३० मिनिटांनी ही सेवा उपलब्ध असेल, बर्डी ते लोकमान्य नगर हा प्रवास फक्त २० रुपयांत करता येणार आहे, असे महामेट्रोकडून कळवण्यात आले आहे.

एकूण ११ कि.मी. लांबीचा हा मार्ग असून त्यावरील लोकमान्य नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर, इस्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी, असे एकूण ६ स्थानके प्रवासी सेवेसाठी सज्ज आहेत.