कोविन अॅपमध्ये तांत्रिक दोष; अनेक वृद्धांना मन:स्ताप
लोकसत्ता खास प्रतिनिधी
नागपूर : जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपच्या गोंधळात वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांना नोंदणीअभावी तासभर ताटकळत रहावे लागले. काहींना प्रमाणपत्र तर काहींना इतर तांत्रिक कारणाने परतावे लागले. शहरात पाच खासगी रुग्णालयांत मंगळवारी लसीकरणाचा शुभारंभ झाला. एकंदरीत स्थिती बघितली तर आरोग्य कर्मचाऱ्यांहून वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह अधिक आहे.
मेडिकल, मेयो, इंदिरा गांधी रुग्णालयासह इतरही केंद्रात सकाळपासून वृद्धांनी गर्दी केली होती. मेडिकल प्रशासनाने सोमवारचा कटू अनुभव बघत लाभार्थीसाठी केंद्राच्या बाहेर मंडप टाकून खुच्र्या लावल्या होत्या. परंतु सकाळी पुन्हा कोविन अॅपमध्ये तांत्रिक दोष आला.
नावाची नोंदणी होत नसल्याने सुमारे तासभर सर्वच केंद्रात वृद्ध ताटकळत राहिले. नोंदणी सुरू झाल्यावरही गर्दीमुळे अनेकांना तब्बल तीन ते चार तासांची प्रतीक्षा करावी लागली. नावाच्या घोळामुळे काही जण लसीकरणाला मुकले. काही आजारी व्यक्तींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने त्यांनाही परतावे लागले. मेडिकलसह काही केंद्रात शेवटी ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लता मंगेशकर रुग्णालयात वृद्धांचे नाव व क्रमांक नोंदवून त्यांना परत बोलावण्याचे आश्वासन देत पाठवले गेले. परंतु त्यातील निवडक लोकांनाच बोलावून लसीकरण झाल्याची तक्रार करण्यात आली. परंतु रुग्णालय प्रशासनने आरोप फेटाळले आहेत.
वृद्धांचा सर्वाधिक प्रतिसाद
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला फारसा प्रतिसाद नव्हता. परंतु वृद्धांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. मंगळवारी आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वृद्धांचेच लसीकरण अधिक झाले. ग्रामीण भागात ७०९ जणांनी लसीची पहिली मात्रा घेतली. त्यात तब्बल ४५३ वृद्ध, ५९ विविध आजार असलेले, १०८ अत्यावश्यक कर्मचारी तर ८९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शहरी भागात १,५९३ जणांनी लसीची पहिली मात्रा घेतली. त्यात सर्वाधिक ९५७ वृद्ध, ६४ विविध आजार असलेले व्यक्ती, २६९ अत्यावश्यक कर्मचारी तर ३०३ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता, तर दुसरी मात्रा शहरात १८७ तर ग्रामीणला ८४९ व्यक्तींना दिली गेली.