सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या बळावरच शांतता ठेवणे शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल निर्भय शर्मा, सेंटरचे अध्यक्ष जवाहरलाल कौल, सेंटरच्या स्थानिक अध्यक्षा मीरा खडक्कार, ज्येष्ठ पत्रकार व संघटनेचे सचिव चारुदत्त कहू, उपाध्यक्ष अवतार कृष्णा रैना उपस्थित होते. डॉ. मोहन भागवत म्हणाले की, काश्मीरसारखीच समस्या देशभरात आहे आणि त्या देशांतर्गत परिस्थितीतूनच निर्माण झाल्या आहेत. याचे मूळ कारण आपण आपली एकता विसरत जाणे हे आहे. आपल्यात दुरावा निर्माण होत असून  देश तुकडय़ांमध्ये विभागला जात आहे. एकात्मतेचा भाव निर्माण झाल्यास हे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी सत्यच नव्हे तर शक्ती आणि भक्तीचीही गरज आहे. जम्मू-काश्मीर आणि लद्दाखचा इतिहास मोठा आहे. त्यात  देशाच्या संस्कृतीचा वारसा आहे. ती वाचवण्यासाठी सरकारकडून मदत होत असली तरी  काही शक्ती त्यात कुरापती करत आहेत. त्यांना सैन्यशक्तीच्या जोरावरच उत्तर द्यावे लागणार आहे. कश्मीर देशाचा अविभाज्य भाग असून त्याला कुणी वेगळे करू शकत नाही. भारत एक अंखड देश आहे व सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे.

यावेळी मिझोरामचे राज्यपाल शर्मा यांचे भाषण झाले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर भारताचे मुकुट आहे. मात्र, काही लोक हा भाग भारतीय नसल्याचा भ्रम निर्माण करतात. तेथे कोणीही हिंदुत्वासाठी काम केल्यास टीका होते. इतर धर्माबाबत मात्र हा निकष लागत नाही. काश्मीरमध्ये भारताचा पाया भक्कम करण्यासाठी ‘कश्मिरीयत’ जिवंत ठेवणे  गरजेचे आहे.

दगडफेकीतून आपलेच नुकसान

जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असे  डॉ. भागवत म्हणाले.