एका भूखंडाचा वाद मिटविण्यासाठी शिवीगाळ करून २२ लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्य़ात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक मुन्ना उर्फ ओमप्रकाश यादव आणि त्यांचा भाऊ बाला उर्फ मनोज यादवांविरुद्ध गुन्ह्य़ात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने शनिवारी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिले.

मुन्ना यादव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. सूर्यकांत उर्फ सूरज लोलगे याने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने हे आदेश दिले. मौजा सोनगाव परिसरात सूरज लोलगे यांच्या मालकीचे काही भूखंड आहेत. त्यासंदर्भात लोलगे, राहुल धोटे व मनीष गुडधे यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, हा वाद सोडविण्यासाठी धोटे आणि गुडधे यांनी मुन्ना यादवशी संपर्क साधला. त्यावर मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांनी लोलगे यांना भ्रमणध्वनी करून शिवीगाळ करून त्या भूखंडावर सुरक्षा भिंत उभारण्यासाठी व पोलिसांना सांभाळण्यासाठी २२ लाखांची खंडणी मागितली. त्यावेळी लोलगे याने आपल्या भ्रमणध्वनीत सर्व संभाषण नोंदवून घेतले आणि त्याची ऑडिओ सीडी तयार करून ४ जुलैला तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी ६ जुलै २०१५ ला गुन्हा दाखल केला. मात्र, वर्ष उलटूनही पोलीस तपास थंडबस्त्यात असल्याने लोलगेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.