भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये फेकला मृतदेह

बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे एका प्रियकराने आपल्या साथीदारांसह मिळून प्रेयसीच्या भावालाच संपवले. ही धक्कादायक घटना नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृत व आरोपी सर्व कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्यांनी उपराजधानीत येऊन खून केला व मृतदेह भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये फेकून पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोहित शांताराम रंगारी (१६) रा. चिपडी, कुही असे मृताचे, तर शानू ईकबाल शेख (२२), विक्की मधुकर पाटील (१९) दोन्ही रा. चिपडी, कुही अशी आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. मृत रोहितने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. तिसरा अल्पवयीन आरोपी हा त्याचा वर्गमित्र होता. तीन वर्षांपासून रोहितच्या बहिणीशी शानू याचे प्रेमसंबंध होते. त्याची माहिती रोहितला समजली. त्याने काही महिन्यांपूर्वी शानूला बहिणीशी प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरू होता.

दहावीची परीक्षा संपताच शानू याने मित्रांना हाताशी धरून रोहितच्या खुनाचा कट रचला. २४ मार्चला रोहितला पार्टी करण्यासाठी दुचाकीने कुही येथील राजपुताना बार व रेस्टॉरेंटमध्ये घेऊन गेले. तेथे दारू प्राशन केल्यानंतर ते नागपुरातील मोमिनपुरा येथून बिर्याणी घेऊन नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतुजीनगर येथे राहणारा आशीष पाटील याच्या खोलीवर गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. बिर्याणी खाल्ल्यानंतर रोहितला फिरायला भांडेवाडीकडे घेऊन गेले. येथे एकाने त्याला पकडून ठेवले व शानूने पाठीमागून दगडाने डोक्यावर वार केला. रोहित मृत होताचा त्याचा मृतदेह बाजूलाच असलेल्या भांडेवाडी डंपिंग यार्डच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला. तीन दिवसांनी स्वच्छता कर्मचाऱ्याला मृतदेह दिसला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सागर भास्कर, दत्ता पेंडकर, रमेश चिखले, स्नेहलता जायभाये, सचिन एम्प्रेडीवार, संजय शाहू, संदीप गवळी, ओंकार बाराभाई, राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगान, प्रवीण गोरटे, दिनेश चवरे, अक्षय सहारे, अतुल चाटे, विजय खंगार, सुरेंद्र बोपचे, दिनेश माणुसमारे, प्रवीण भगत, अभय मारोडे आदींनी तीन दिवस सतत तपास करून खुनाचा छडा लावला व आरोपींना अटक केली. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती तिलक यांनी यावेळी दिली.

रोहितच्या शोधाचाही बनाव रचला

आरोपी हे रोहितला घेऊन गेले होते, याची माहिती त्याच्या बहिणीला होती. त्याच्या बहिणीने आरोपींना भाऊ कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रोहितला गावाजवळ सोडले होते. त्यानंतर तो कुठे गेला, हे माहीत नसल्याचे सांगितले. त्याच्या घरच्यांनी त्याच रात्री कुही पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे आरोपींनी कुणालाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून फेसबुकवरून रोहितचे छायाचित्र मोबाईलमध्ये टाकून कुटुंबीयांसह त्याची शोधाशोध सुरू केली, पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला.