दुसऱ्यांदा कॅबिनेटचा दर्जा :- काँग्रेसकडून उत्तर नागपुरातून चौथ्यांदा आमदार झालेले डॉ. नितीन राऊत यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून आज मुंबईत शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये डॉ. राऊत यांचा समावेश होता. राऊत यांना संधी देताना काँग्रेसने प्रादेशिक समतोल साधला.

डॉ. राऊत यांचा जन्म समान्य कुटुंबात झाला. वडील मिल मजदूर होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर ते महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आले. तेथून ते  सातव्या वर्गापासून स्वास्तिक हायस्कूल शिकले. विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड असल्याने ते अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय झाले. विद्यार्थी नेता म्हणून ते विद्यापीठात सक्रिय होते. १९७९ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस या पदावरही काम केले.  इंदिरा गांधी यांच्या समर्थनार्थ १९७८ मध्ये जेल भरो आंदोलनात सहभागी झाले.

काँग्रेसमधील त्यांच्या राजकीय प्रवास  ३७ वर्षांपासून अविरत सुरू आहे. ते मार्च २०१८ मध्ये त्यांना अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष होते.  १३ जुलै २०१९ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.  त्यांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद देखील भूषवले आहे.

डॉ. राऊत हे अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर येथील आमदार आहेत. ते येथून १९९९, २००४ आणि २००९ असे सलग तीनदा निवडून आले. २०१४ ला ते पराभूत झाले आणि पुन्हा २०१९ ला याच मतदारसंघातून विजयी झाले. राऊत यांना २०१४ मध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. त्यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि जल संवर्धन खाते होते. त्यापूर्वी त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य हे खाते होते. ते सर्व प्रथम मंत्री झाले. तेव्हा त्यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. त्यांच्याकडे गृह, कारागृह, उत्पादन शुल्क आणि कामगार खाते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीत त्यांच्याकडे कोणते खाते मिळते. याकडे लक्ष लागले आहे.