अनेक दिवसांनी करोनामुक्तांहून बाधितांची संख्या जास्त; २४ तासांत ६ मृत्यू; २६३ नवीन रुग्णांची भर

जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या पुन्हा  वाढताना दिसतेय.  मंगळवारी दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला तर २६३ नवीन बाधितांची भर पडली. विशेष म्हणजे, अनेक दिवसांनी नागपुरात दैनिक करोनामुक्तांहून  बाधित जास्त आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

दिवसभरात करोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील १५५, ग्रामीण भागातील ५६ अशा एकूण २११ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ७९ हजार २३८, ग्रामीणची २० हजार ९६१ अशी एकूण १ लाख १९९ वर पोहचली आहे. याशिवाय दिवसभरात शहरात २१८, ग्रामीण ४४, जिल्ह्य़ाबाहेर १ असे एकूण २६३ नवीन  रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८४ हजार २५९, ग्रामीण २१ हजार ९२९, जिल्ह्य़ाबाहेर ६३६ अशी एकूण १ लाख ६ हजार ८२४ वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २, ग्रामीणला ३, जिल्ह्य़ाबाहेरील १ असे सहा मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूची संख्या २ हजार ४८०, ग्रामीण ५९७, जिल्ह्य़ाबाहेरील ४५४ अशी एकूण ३ हजार ५३१ वर पोहचली आहे.

दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात  एक- दोन दिवस वगळले तर इतर दिवसांमध्ये दैनिक करोना बाधितांहून करोनामुक्तांची संख्या अधिक होती. परंतु मंगळवारी पुन्हा करोनामुक्तांहून नवीन रुग्ण अधिक आढळले.

रुग्णालयांत ८४८ बाधितांवर उपचार

शहरात मंगळवारी २ हजार ५४१, ग्रामीणला ५५३ असे एकूण ३ हजार ९४ सक्रिय करोनाबाधित नोंदवले गेले. त्यातील १ हजार ९८३ रुग्ण गृह विलगीकरणात तर ८४८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.