अजनीतील दोन खून वगळता एकही मोठा तपास नाही

परिमंडळनिहाय गुन्हे शाखेच्या कार्यालयाचे विकेंद्रीकरण होताच गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस खालावत आहे. अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या दोन खुनांच्या घटना वगळता इतर कोणत्याही मोठय़ा तपासात गुन्हे शाखेला यश मिळालेले नाही. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या उद्देशानेच निर्माण करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कामगिरीचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वी सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक-१ मध्ये गुन्हे शाखेचे कार्यालय होते. परिमंडळनिहाय काम बघणाऱ्या गुन्हे शाखेच्या चमू याच कार्यालयात बसायच्या. या ठिकाणाहून सर्व प्रकारचे काम चालायचे, परंतु गुन्हे शाखेची कामगिरी उंचावण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेत जाणे आवश्यक आहे. त्यांचा जनसंपर्क वाढावा आणि तपासात लोकांचे सहकार्य मिळविण्यासाठी गुन्हे शाखेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. १ ऑगस्ट २०१६ ला गुन्हे शाखेची कार्यालये परिमंडळात गेली. प्रत्येक परिमंडळात पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि शिपाई देण्यात आले. एका परिमंडळात तपासाकरिता दोन चमू आहेत. सकाळी अधिकारी गुन्हे शाखा उपायुक्तांकडे हजेरी लावतो आणि दिवसभर अधिकारी व कर्मचारी परिमंडळातच असतात. काही कामगिरी असल्यास संध्याकाळी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना माहिती देण्यात येते.

परंतु, जेव्हापासून गुन्हे शाखेची कार्यालये परिमंडळात गेली, तेव्हापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवणे वरिष्ठांना कठीण झाले. उपायुक्तांच्या कार्यालयापासून परिमंडळाची कार्यालये दूरवर असल्याने त्यांना भेट देता येत नाही. त्यामुळे परिमंडळाच्या कार्यालयात काय चालू आहे, कशाचा तपास सुरू आहे? यावर लक्ष ठेवता येत नाही. वरिष्ठांच्या नजरेपासून दूर असल्याने अधिकारी व कर्मचारीही बिनधास्त असतात. काहींनी तर गुन्हेगार, अवैध धंदे चालविणाऱ्यांशी संबंध निर्माण केल्याचीही माहिती समोर येत आहे.  गेल्या दहा महिन्यात गुन्हे शाखेने केवळ अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी बार समोरील युवकाचा खून आणि वैद्य दाम्पत्याच्या खुनाचा छडा लावण्यात यश मिळविले. त्या व्यतिरिक्त गुन्हे शाखेला एकाही मोठय़ा तपासात यश आले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या परिमंडळांमधील कार्यालयांतील कामगिरीचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या गुन्ह्य़ांमध्ये यश का नाही?

गुन्हे शाखेचे विकेंद्रीकरण करताना तत्कालीन पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी सांगितले होते की, चोरी, लुटपाट आणि छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्य़ांचा तपास करण्यास पोलीस ठाणी सक्षम आहेत. मोठय़ा गुनह्य़ांचा तपास करणे आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम गुन्हे शाखेच्या परिमंडळ कार्यालयातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रतापनगर वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ खून, वाडी परिसरातील खून, एमआयडीतील बलात्कार, तहसीलमधील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांचा खून, जरीपटका येथील मणप्पुरम गोल्ड दरोडा आदींचा छडा लावण्यात पोलिसांना यशच आले नाही. केवळ चोर पकडण्यातच गुन्हे शाखा मश्गूल असून शहरात सट्टा, जुगार, गांजा-चरस तस्करी, देहव्यापार, हुक्का पार्लर, अवैध धंदे, शस्त्रांची तस्करी राजरोसपणे सुरू आहे.

कामगिरीचा लवकरच आढावा

गुन्हे शाखेच्या परिमंडळातील कामगिरीचा लवकरच आढावा घेण्यात येईल. प्रत्येक चमूला त्यांची कामगिरी विचारली जाईल. समाधानकारक काम नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करून नवीन अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत आणण्यात येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गुन्ह्य़ांचा तपास करणे, छडा लावणे आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यावरच भर द्यावा. कुणाचे गैरप्रकार समोर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

संभाजी कदम, उपायुक्त, गुन्हे शाखा