नागपूर विभागाने इतिहास रचला

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज, गुरुवारी एक नवा अध्याय लिहिण्यात आला. नऊ रेल्वे इंजिनसह २.८ किलोमीटर लांब मालगाडी चालवण्याचा विक्रम दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आपल्या नावावर केला.

रेल्वेत नवीन प्रयोग सुरू आहेत. त्याअंतर्गत रुळांची क्षमता तपासून पाहण्यासाठी तसेच वेळेच्या बचतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर विभागाने परमलकसा ते दुर्ग या स्थानकादरम्यान गुरुवारी मालगाडी चालवली. यासाठी चार मालगाडय़ांना एकत्र  जोडण्यात आले. या गाडीला २३६ व्हॅगन, चार ब्रेक व्हॅन आणि विजेवर चालणारे तब्बल नऊ इंजिन जोडण्यात आले. या गाडीने दोन स्थानकादरम्यानचे २२ किलोमीटरचे अंतर ४५ मिनिटांत कापले. परमलकसा येथून ही गाडी दुपारी १२.२० वाजता निघाली आणि दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी पोहोचली आणि सर्वात लांब मालगाडी चालवण्याचा नवीन विक्रम झाला. आता ही मालगाडी दुर्गहून बिलासपूर आणि तेथून कोरबा येथे जाणार आहे.

अशाप्रकारे रिकाम्या डब्यांची सर्वात लांब मालगाडी चालवण्याचा मान नागपूर विभागाला मिळाला आहे, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांनी म्हटले आहे. रिकामी मालगाडी कमी वेळात माल भरण्यासाठी जावी म्हणून रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी स्पीड गनच्या माध्यमातून वेळोवेळी आकस्मिक निरीक्षण केले जाते. त्या परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात रिकाम्या मालगाडीचा वेग वाढला आहे.

आधी रिकाम्या मालगाडीचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास होता. आता तो वाढून ८० किलोमीटर प्रतितास झाला आहे, असे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक के.व्ही. रमना यांनी सांगितले.