शासनाच्या अधिसूचनेआधीच महापालिकेची घोषणा

नागपूर : करोनाबाधित शहराला लालक्षेत्राबाहेर काढण्यासंदर्भात राज्य शासनाने निश्चित केलेले सहापैकी पाच निकष नागपूर शहर पूर्ण करीत असतानासुद्धा केवळ महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आग्रहामुळे राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने नागपूर शहराला पुन्हा ३१ मेपर्यंत लालक्षेत्रात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी यासंदर्भात राज्यशासनाची अधिकृत अधिसूचना जारी होण्यापूर्वीच महापालिकेने रात्री दहा वाजता नागपूर पुन्हा लालक्षेत्रातच राहील, असे प्रसिद्धी पत्रक जारी करण्याची ‘अद्भुत’ तत्परता दाखवली. या नव्या निर्णयामुळे नागपूरकरांना मिळालेला दिलासा क्षणिक ठरला आहे.

टाळेबंदीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर शासनाने राज्यभरातील करोना साथीचा आढावा घेतला. या आढाव्यातून जी वस्तुस्थिती समोर आली त्या आधारावर राज्यशासनाच्या उच्चाधिकार समितीने १९ मे रोजी नागपूर शहराला लालक्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. एखाद्या शहराला लालक्षेत्रातून वगळण्यासाठी सहा निकष ठरवण्यात आले आहेत. यापैकी पाच निकष नागपूर पूर्ण करते. फक्त ‘करोना सॅम्पल कन्फर्मेशन रेट’ हा एकूण चाचण्यांच्या सहा टक्क्यांपेक्षा कमी असावा लागतो. तो नागपूरमध्ये सातपेक्षा अधिक आहे. या एका कारणाचा आधार घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला लालक्षेत्रातून वगळू नये, असा आग्रह लालक्षेत्राबाहेर पडण्याच्या एक दिवसाआधीपर्यंत राज्य शासनाकडे लावून धरला.

अखेर राज्य शासनाच्या समितीने त्यांचा हा आग्रह मान्य केला. त्यामुळे आता ३१ मेपर्यंत नागपूर पुन्हा लालक्षेत्रातच समाविष्ट राहणार आहे. शहर पुन्हा लालक्षेत्रात आल्याने  एसटी बसची चाके थांबलेलीच राहतील.