केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एक टक्का अबकारी कराच्या विरोधात गेल्या एक महिन्यापासून सराफा व्यावसायिकांची प्रतिष्ठाने बंद आहेत. ती गुढीपाडव्याच्या दिवशी बंद राहतील, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात व्यावसायिकांनी स्वतचे नुकसान होऊ नये यासाठी शहरातील विविध भागातील प्रतिष्ठाने सुरू ठेवून लाखो रुपयांची सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री केली. त्यामुळे सराफा व्यावसायिकांचा बंद हा केवळ नावाला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीच्या मान्यतेप्रमाणे अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या या सणानिमित्त सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सराफा व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला असून गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यामुळे सराफा ओळ बंद राहील अशी अपेक्षा होती. या दिवशी मोठय़ा प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते. बंदचा फटका बसू नये म्हणून शहरातील विविध भागातील सराफा व्यावसायिकांनी असोसिशनच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता प्रतिष्ठाने सुरू ठेवली. ग्राहकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे दिसून आले. विशेषत विदर्भातील सराफा असोसिएशनचे कार्यालय इतवारी भागात असून त्या ठिकाणी असोसिएशनच्या अनेक पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठाने आहेत. त्यांनी ती सुरू ठेवली. काहींनी अर्धशटर उघडून व्यवसाय केला काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने पूर्णपणे उघडली. धरमपेठ, गोकुळपेठ, बडकस चौक, महाल, सक्करदरा, लक्ष्मीभवन या भागातील सराफा व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू होती. प्रतिष्ठानच्या बाहेर दागिन्यांना पॉलिश करणारे बसलेले असतात. ते सुद्धा बाजारपेठेत दिसून आले.
संप कायम राहणार -अरमकर
या संदर्भात सराफा असोसिएशनचे पदाधिकारी राजू अरमकर यांनी सांगितले, सराफा बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते आणि गुढीपाडवा असल्यामुळे काही ग्राहकांनीा महिन्याभरापूर्वी दागिन्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे काही सराफा व्यावसायिकांनी त्या ग्राहकांचे दागिणे दिले. नवीन ग्राहकांना आलेल्या ग्राहकांना दागिन्यांची विक्री करण्यात आली नाही. उद्या शनिवारपासून पुन्हा संप कायम राहणार आहे.