|| मंगेश राऊत

पोलिसांच्या आशीर्वादाने गोरखधंदा

नागपूर : उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात मोठय़ा प्रमाणात गोवंश आणि मांसाची तस्करी सर्रासपणे होत असून कामठी परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध कत्तलखाने सुरू आहेत. कामठीतील गोवंश तस्कर हैदराबाद मार्गाने विदेशात गोमांस पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा जोमात सुरू असल्याचे कळते.

२०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यात गोवंश तस्करी व कत्तल करण्यावर बंदी घातली. त्यानंतरही शहरातील अनेक भागात गोवंश तस्करी मोठय़ा प्रमाणात होत असून कामठी हे गोवंश व मांस तस्करीचे हब असल्याची माहिती समोर येत आहे. कामठीमध्ये मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात गोवंश चोरीच्या मार्गाने आणले जाते. या गोवंशाची कत्तल करून मांस हैदराबाद व मुंबईला पाठवले जाते. याकरिता मोठय़ा ट्रकचा वापर केला जातो. कामठीतील गोवंशाचे मांस हैदराबादमधून विदेशात पाठवण्यात येते. दररोज असे चार ते पाच ट्रक रवाना होतात. पण, अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांसोबत स्थानिक पोलिसांचे संगनमत असल्याने अपेक्षेप्रमाणे कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हे आहेत तस्कर

मध्यप्रदेशातून खवासा मार्गे कामठीत गोवंशाची तस्करी करण्यात येते. मोठा अनीस (बडा), छोटा अनीस, शम्मू हाजी, सलीम हाजी व त्यांचा मुलगा, फारुख कुरेशी, इकराम आरीफ, बबलू आसिफ हाजी यांची नावे यात आघाडीवर असल्याचे कळते. कामठीतील भाजी बाजाराच्या बाजूला असलेल्या दग्र्याजवळ गोवंश साठवले जाते.  कत्तलखान्यातून मांस निघाल्यानंतर सलीम हाजी ते मांस विकत घेतो व  हैदराबाद व मुंबईला पाठवतो. हैदराबाद मार्गाने विदेशात पाठवला जातो.

कामठीत गोवंश तस्करी

होत असल्याची माहिती मिळाल्याने अनेकदा कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी एक पथकही तयार करण्यात आले. पण, आता ते पथक गुन्हे शाखेच्या कामात व्यस्त आहे. लवकरच पथक कार्यान्वित होईल व गोवंश तस्करीवरील कारवाई अधिक गतिमान करण्यात येईल. स्थानिक पोलिसांनाही कारवाईचे आदेश देण्यात येतील.

– निलोत्पल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-५.