शंटिंग इंजिन दाखल, कोचेसही येणार
ऑगस्ट महिन्याअखेर खापरी ते विमानतळ या पाच किलोमीटर जमिनीवरून धावणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या चाचणीसाठी आवश्यक ती सर्व तयारी नागपूर मेट्रो प्रकल्प व्यवस्थापनाने पूर्ण केली आहे. चाचणीसाठी लागणारे शंटिंग इंजिन (बुलंद) मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आणण्यात आले आहे. मेट्रो कोचेस (डबे) हैदराबाद येथून आल्यावर चाचणीची प्रक्रिया सुरू होईल.
दोन वर्षांपूर्वी नागपुरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील खापरी ते विमानतळ (न्यू एअरपोर्ट) स्थानक या दरम्यानच्या जमिनीवरून धावणाऱ्या पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तेथे रुळ टाकण्यात आले असून इतर तांत्रिक कामेही पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात या रुळावरून मेट्रोची चाचणी सुरू होईल. त्यासाठी लागणारे शंटिंग इंजिन नागपुरात दाखल झाले आहे. त्याचे काम गुरुवारी नागपंचमीपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी १०० मीटर रुळाची चाचणी या इंजिनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. हैदराबाद येथून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात तीन कोचेस नागपुरात येणार आहेत. तेथून रस्ता मार्गाने ते नागपुरात येतील. पाठविण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. कोचेस आल्यावर ते या शंटिंग इंजिनला जोडण्यात येतील. रुळ आणि कोचेस यांची सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती तपासणी करून व त्यासंदर्भातील रेल्वेच्या विविध मान्यताप्राप्त विभागाकडून प्रमाणपत्र घेतल्यानंतर मेट्रो पुढच्या प्रवासासाठी सज्ज होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. शंटिंग इंजिनच्या कामाची सुरुवात ही नागपूर मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे ब्रिजेश दीक्षित म्हणाले. बुलंद हे बॅटरीवर चालणारे इंजिन असल्याने पर्यावरणाचीही हानी होणार नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. मेट्रो चाचणी ही प्रदीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. सुरक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली जाते. त्यामुळे याला विलंब लागतो. जयपूर मेट्रोची चाचणी ही दीड वर्षांपर्यंत चालली होती हे येथे उल्लेखनीय. मुंबईनंतर सर्वप्रथम धावणारी नागपूर ही पहिली मेट्रो असेल.