जिल्ह््यात २४ तासांत ६५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर ६ हजार ८२६ नवीन रुग्णांची भर पडली. करोनामुक्तांच्या तुलनेत  बाधितांची संख्या जास्त असल्याने सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ६१ हजार ६२ रुग्णांवर पोहोचली.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ३८ हजार ६५७, ग्रामीणच्या २२ हजार ४०५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह््यातील एकूण रुग्णांत ५३ हजार ६४४ करोनाग्रस्तांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ७ हजार ४१८ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, २४ तासांत शहरात ३६, ग्रामीण २२, जिल्ह््याबाहेरील ७ असे एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ६७७, ग्रामीण १ हजार ३०१, जिल्ह््याबाहेरील ९२५ अशी एकूण ५ हजार ९०३ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ४ हजार ६७५, ग्रामीण २ हजार १४४, जिल्ह््याबाहेरील ७ असे एकूण ६ हजार ८२६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या २ लाख २० हजार ३०३, ग्रामीण ६९ हजार ६३३, जिल्ह््याबाहेरील १ हजार १०७ अशी एकूण २ लाख ९१ हजार ४३ रुग्णांवर पोहोचली आहे.

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये करोना बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत याची माहिती  http://www.nmcnagpur.gov.in http://nsscdcl.org/covidbeds या संकेतस्थळावर क्लिक करून घेता येईल. तसेच हेल्पलाईन क्र. ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत ऑक्सिजन खाटा ७७ आणि नॉन ऑक्सिजन खाटा ४५ उपलब्ध होत्या.

उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

रात्री ८ वाजताच्या सुमारास मेडिकलचे प्रवेशद्वार बंद करून रुग्णांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे एका वकिलांने आतमध्ये संदेश पाठवला. काही वेळाने परत संदेश आला की रुग्णाला आतमध्ये घेतले पण ओपीडीमध्ये  मृत्यू झाला. प्रवेशद्वाराबाहेर प्रतीक्षा करताना वेळ गेल्याने उपचाराअभावीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे यातून समोर आले.

करोनामुक्तांचे प्रमाण ७६.९९ टक्के

शहरात दिवसभरात २ हजार ५१८, ग्रामीण १ हजार असे एकूण ३ हजार ५१८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ७७ हजार ६७५, ग्रामीण ४६ हजार ४०३ अशी एकूण २ लाख २४ हजार ७८ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्यात तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण ७६.९९ टक्के आहे.

व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत ऑक्सिजन १७ वर

एका करोना रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. डॉक्टरांनी दुसरीकडे हलवण्यास सांगितले. दोन दिवसांपासून नातेवाईक व्हेंटिलेटर असेलेले रुग्णालय शोधत होते. शेवटी सोमवार व मंगळवारचा पूर्ण दिवस गेल्यानंतर मंगळवारी रात्री कामठी मार्गावरील होप रुग्णालयात व्हेंटिलेटर भेटले. परंतु रुग्णाची ऑक्सिजनची पातळी १७ पर्यंत खालावली होती. कधीकधी व्हेंटिलेटरवर ऑक्सिजनही दाखवत नसल्याने  आम्ही चिंतेत होतो, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.