सेनेची स्वतंत्र लढण्याची घोषणा; लोकसभेसाठी उमेदवाराची चणचण

शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे झाले तर राज्याच्या उपराजधानीत सेनेला उमेदवार शोधण्यापासून तयारीला सुरुवात करावी लागेल. त्यामुळे नागपुरात युती तुटण्याचे काहीही परिणाम भाजपवर होण्याची शक्यता सध्यातरी नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे साहजिकच नागपूर लोकसभा मतदारसंघातही त्यांना उमेदवार उभा करावा लागणार आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध तेवढाच प्रबळ उमेदवार सेनेला द्यावा लागेल. सध्याची शिवसेनेची या मतदारसंघातील स्थिती बघता असा उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना उमेदवार शोधण्यापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करावी लागेल किंवा इतर पक्षातून आयात केलेला किंवा सक्षम नवा चेहरा शोधावा लागेल.

मागील लोकसभा निवडणूक भाजप-सेनेने एकत्र लढली. त्यावेळी जिल्ह्य़ातील दोन लोकसभा मतदारसंघात युतीला विजय मिळाला. नागपूर भाजपने तर रामटेक सेनेने जिंकले होते. त्यानंतरची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढली. त्यात जिल्ह्य़ातील एकूण १२ पैकी एकही जागा सेनेला जिंकता आली नाही. उलट त्यांच्याकडे अनेक वर्षे असलेली रामटेक विधानसभेची जागाही भाजपनेजिंकली. शहरातील सहाही मतदारसंघात भाजपला आव्हान देऊ शकेल असा एकही सक्षम उमेदवार सेनेला मिळाला नव्हता. या उमेदवारांना मिळालेली मते नगन्य होती. दक्षिण नागपूरमध्ये १३ हजार मते मिळाली तर पूर्व नागपुरात सहा हजार मते मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिममध्ये तीन हजारावरच सेनेचा उमेदवार थांबला, तर पश्चिममधील मतांची संख्या ही केवळ अकराशे होती. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेला सर्वच प्रभागात उमेदवार मिळाले नव्हते. या निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले, तर सेनेला दोन जागा मिळाल्या. गडकरी यांचे गेल्या निवडणुकीतील विजयाचे मताधिक्य साडेतीन लाखाचे होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर लोकसभा निवडणुकीत सेना स्वबळावर जरी लढली तरी भाजपपुढे आव्हान उभे करू शकेल, अशी सध्याची तरी स्थिती नाही.

सत्तेत सहभागी राहून भाजप विरुद्ध टीका करण्याचे सेनेचे धोरण नागपुरातही कायम आहे. तसेच मित्र पक्ष असूनही सेनेला अडगळीत टाकण्याची भूमिका येथे सुरुवातीपासून भाजपची राहिली आहे. भाजपपुढे आव्हान उभे करता यावे म्हणून सेनेने येथील संघटनात्मक पातळीवर बदल केले. आक्रमक स्वभावाचे प्रकाश जाधव यांच्याकडे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, जाधव पूर्वी इतके सक्षमपणे आता काम करू शकेल याबाबत सेनेतच शंका घेतली जात आहे. शिवाय ते ग्रामीण भागातील असल्याने त्यांना शहरावर पकड मिळवण्यासाठी वेळ लागणार आहे. जाधव यांनी २००७ मध्ये रामटेक लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगण्यातून आणि मागील वर्षी झालेल्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतील त्यांची कामगिरी फारच सुमार राहिली.

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी मात्र निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर पक्षाची ताकद जोखणे योग्य नाही, असे स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपाच्या अंतिम टप्प्यात युती तुटल्याने उमेदवार ठरवताना घाई झाली, त्याचा फटका पक्षाला बसला. मात्र, आता निवडून येण्याच्या गुणवत्तेवर तिकीट वाटप झाल्यास निश्चितपणे शिवसेना भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीत येईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, नागपूरच्या उलट स्थिती रामटेकची आहे. रामटेक हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे तेथे भाजपला उमेदवार शोधावा लागणार आहे. येथे सध्या शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत.

पूर्ण ताकदीने लढू

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आगामी निवडणुका शिवसेना सक्षमपणे लढेल व जास्तीत जास्त उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न करेल.

कृपाल तुमाने, खासदार, रामटेक, शिवसेना