२७४ नवीन रुग्णांचा उच्चांक 

नागपूर : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात प्रथमच २४ तासांत नवीन २७४ बाधितांची भर पडली तर मेडिकल आणि मेयो रुग्णालयांत दिवसभरात तब्बल दहा बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. नवीन बाधितांचा उच्चांक व सर्वाधिक मृत्यूमुळे शहराची चिंता वाढली आहे.

मेयोत दगावलेल्या चार रुग्णांमध्ये डिगडोह (हिंगणा) येथील एका ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याला १९ जुलैला दाखल करण्यात आले होते. त्याला टाईप २ मधुमेहासह इतरही काही त्रास होते. त्याचा रविवारी मृत्यू झाला. लष्करीबाग येथील ४३ वर्षीय महिलेला २६ जुलैला दाखल करण्यात आले होते. २७ जुलैला तिचा मृत्यू झाला. तिसरा मृत्यू पेन्शन नगर, नेहरी कॉलनी, काटोल रोडवरील ७४ वर्षीय पुरुषाचा झाला. त्याला २२ जुलैला दाखल करण्यात आले होते. तर चौथा मृत्यू नाईक रोड, महालवरील ६९ वर्षीय पुरुषाचा झाला. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबसह इतरही त्रास होते. त्याचा आज मृत्यू झाला.

मेडिकलला दगावलेल्या सहा रुग्णांमध्ये बैद्यनाथ चौक परिसरातील पुरुषाचा समावेश आहे. त्याला २५ जुलैला दाखल करण्यात आले होते. तर रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसरा ६३ वर्षीय पुरुष आग्याराम देवी परिसरातील आहे. त्याला २१ जुलैला दाखल केले होते. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. तिसरी मोठा ताजबाग परिसरातील ५७ वर्षीय महिलेला २५ जुलैला दाखल करण्यात आले होते. तिचा रविवारी रात्री मृत्यू झाला. चौथा महादुला परिसरातील ४५ वर्षीय पुरुष २४ जुलैला दाखल झाला होता. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. पाचव्या अनमोल नगर येथील ६३ वर्षीय पुरुषाला २५ जुलैला दाखल केले होते. त्याचा सोमवारी मृत्यू झाला.  कमाल चौक येथील व्यक्तीला १७ जुलैला दाखल करण्यात आले होते. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. २४ तासांत मेडिकलचे ६ आणि मेयोचे ४ असे एकूण दहा रुग्ण दगावल्याने आजपर्यंतच्या येथील मृत्यूंची संख्या थेट ९२ झाली आहे. सोबत शहरातील विविध प्रयोगशाळेत दिवसभरात प्रथमच २७६ नवीन बाधित आढळल्याचा उच्चांक नोंदवला गेला. त्यामुळे आता नागपुरातील करोनाचे संक्रमण झपाटय़ाने वाढत असल्याचे समोर आले आहे.

उपराजधानीतील मृत्यूसंख्या पन्नास पार

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांत २४ तासात शहरातील विविध भागातील सात जणांचा मृत्यू नोंदवला गेला. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांच्या मृत्यूची संख्या पन्नासच्या पुढे गेली आहे.   नवीन बाधितांमुळे आजपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्याही थेट ३,२२० वर गेली आहे.  नागपूरच्या ग्रामीण भागातही आजपर्यंत १५ मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यातच नवीन बाधितांमुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १,११६ वर पोहचली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या सतराशेच्या उंबरठय़ावर

नागपूर जिल्ह्य़ातील शहर व ग्रामीण भागात आजपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्या आता ४,३३६ वर पोहचली आहे. यापैकी २,५८३ जण बरे होऊन घरी परतले आहेत.  प्रथमच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या  १,६६५ वर पोहचली आहे. यापैकी १,१८८ रुग्णांवर मेडिकल, मेयो, एम्ससह इतर कोव्हिड रुग्णालये आणि कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.  सोमवारी दुपारी ४७७ रुग्ण दाखल होण्याच्या प्रतीक्षेत होते.

महावितरणचे संचालक व पीडब्ल्यूडीचे अधिकारीही बाधित

मूळ नागपूरचे रहिवासी असलेले महावितरणचे एक संचालक दर्जाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) एक अभियंताही बाधित आढळले. महावितरणच्या संचालकांना वोक्हार्ट रुग्णालयात तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मेडिकलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

तीन हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटर

उपराजधानीतील एकाच नामांकित ग्रुपच्या तीन हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचा निर्णय झाला असून येथे लवकरच लक्षणे नसलेल्यांसह सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार ठेवले जाणार आहे. इतर दोन ते तीन हॉटेल्ससोबतही प्रशासनाची बोलणी सुरू असून तेथेही ही सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.  या हॉटेल्समध्ये माफक उपचार शुल्क आकारले जाईल.