स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन शुभेच्छांचा सन्मान

नागपूर : नागपुरातील अजनी, सीआरपीएफ व वायुसेनानगरच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. इस्रोने या नागपूरकर विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे शुभेच्छा पत्र चक्क ट्विटवर टाकत योग्य तो सन्मान प्रदान केला आहे.

इस्रोने अलीकडे चांद्रयान -२ मोहिमेला प्रारंभ केला आहे. भारताचे चांद्रयान चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले आहे. या संस्थेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या शाळांमधून प्रयत्न केले जाते. यावर्षी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आले.

त्यामुळे  या तिन्ही नागपुरातील अजनी, सीआरपीएफ व वायुसेना नगरच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारतीय सैनिक, अशोक चक्र, हुतात्मा स्मारक आणि वेगवेळ्या रंगातील राख्या रेखाटून शुभेच्छा पत्रे तयार केली. ही शुभेच्छा पत्रे इस्रोला पाठवली. स्वत तयार करून या संस्थेला शुभेच्छापत्र पाठवण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांचे इस्रोनेही उत्साहाने स्वागत केले आणि सर्व शुभेच्छापत्र एकत्र करून ट्विट केले. तसेच केव्ही अजनी, केव्ही सीआरपीएफ आणि केव्ही वायुसेनानगर, नागपूर शाळेतील विद्यार्थ्यांनी इस्रोला दिलेल्या शुभेच्छाबद्दल आभार मानले. अनेकांनी हे ट्विट रीटिवज करीत फॉरवर्डही केले आहे. विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांना अशाप्रकारे इस्रोने योग्य सन्मान दिला.