नागपूर शहराला शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे नागपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले असून वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर इतका होता.

शनिवारी संध्याकाळी नागपूर आणि लगतच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मे महिन्यातील या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला. ऐन वेळी पावसाच्या हजेरीने पादचारी तसेच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती.

नागपूरमध्ये अवघ्या २४ तासात तापमानात दीड अंश सेल्सिअसने वाढ होऊन पारा शुक्रवारी ४६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. शनिवारी त्याच वाढलेल्या तापमानावर वादळी पावसाने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. तापमान तब्बल २.७ अंश सेल्सिअसने कमी होत पारा ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला हा गारवा कायमस्वरुपी नाही तर उकाडा वाढवणारा आहे, अशीच प्रतिक्रिया यावेळी वादळी पावसाचे थैमान अनुभवणाऱ्यांची होती. सुमारे दीड तास वादळी पावसाचे थैमान कायम होते. त्यानंतर मात्र वादळी पावसाचा वेग कमी झाला. गडकरी यांच्या स्वागत सोहोळ्यासाठी रेशीमबाग मैदान सज्ज होत असतानाच यासाठी तयार करण्यात आलेला मंडप वादळामुळे उडून गेले. तर ध्वनीयंत्रणा देखील पडली. वाऱ्याचा वेग इतका होता की एलएडी वॉलदेखील पडली. तर प्रभाग क्रमांक १७ येथे विजेचा खांब कोसळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.