विद्यापीठाची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस; कुठे ‘लॉगिन’ नाही तर कुठे पेपरच जमा होईना
नागपूर : विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तंत्रस्नेही व्हावे, असे भाषणांमधून बौद्धिक देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा चौथा दिवसही तांत्रिक अडचणीचा ठरला. आज सुरुवातीला ‘परीक्षा अॅप’मध्ये लॉगिन करताना विद्यार्थ्यांना घाम फुटला. बऱ्याच प्रयत्नानंतर लॉगिन झाले, तर पेपरच जमा होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. यामुळे विद्यार्थी, पालक, प्राधिकरण सदस्यांसह शैक्षणिक वर्तुळात विद्यापीठाविषयी प्रचंड असंतोष पसरला असून आज सोमवारच्या परीक्षेने विद्यापीठाची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे.
नागपूर विद्यापीठाची परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली असली तरी आतापर्यंत झालेल्या पेपरला विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने बरीच कमी होती. तीन दिवसांत दररोज सरासरी तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असतानाही विद्यापीठाला परीक्षेत सपशेल अपयश आले.
त्यामुळे आज सोमवारपासून मुख्य परीक्षांना सुरुवात होणार असल्याने विद्यापीठासाठी हे आव्हानात्मक होते. मात्र, विद्यापीठ हे आव्हान पेलण्यात अपयश ठरले असून सोमवारच्या परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाच्या रोजच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा परीक्षा अॅपची सर्वाधिक चिंता असल्याने अनेकांनी सांगितले. या संपूर्ण गोंधळावर विद्यापीठ प्रशासनाने चुप्पी साधली आहे.
विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ – महापौर
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेवेळी कधी विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाही तर कधी लॉग इनमध्ये अडथळे येतात.ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला पोरखेळ आहे, असा टीका महापौर
संदीप जोशी यांनी सोमवारी केली. ऑफलाईन परीक्षा घेण्यात नेमकी काय अडचण आहे. याऐवजी शारीरिक अंतराचे पालन करीत ऑफलाईन परीक्षा घ्यावी असेही ते म्हणाले. विद्यापीठाने यातून मार्ग काढण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा अभ्यास करावा. अशा गोंधळादरम्यान विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन मोठा आधार असतो, मात्र त्यावरही प्रतिसाद मिळत नाही, मग ती काय कामाची, असा संतप्त सवाल जोशी यांनी केला आहे.
अनेकांचे ‘लॉगिन’च झाले नाही
सोमवारी चार टप्प्यात ४० पेपर व सरासरी दहा हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. परीक्षा अॅप उघडताच त्यावर सुरुवातीला लॉगिन करणे आवश्यक होते. मात्र, विद्यापीठाने दिलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकूनही अॅप उघडत नसल्याच्या शेकडो तक्रारी विद्यापीठाकडे आल्या, तर काही विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊन पेपर सोडवला मात्र तो वेळेत जमा होत नसल्याने परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. पॉवर इंजिनिअरिंग महाविद्यालयातील पन्नास पैकी के वळ दोनच विद्यार्थ्यांचे पेपर जमा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर सर्वच स्तरातून ताशेरे ओढले जात आहेत.
मदत केंद्राचेही हात वर
परीक्षेवेळी आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांनी मदत केंद्रावर फोन केला असता उलटसुलट उत्तर मिळत असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या. याशिवाय मदत केंद्राने हातवर केल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राधिकरणांच्या सदस्यांशी संपर्क करून आपले गाऱ्हाणे मांडले.
प्राधिकरण सदस्यांसोबत अरेरावीची भाषा
चार दिवसांच्या परीक्षांमध्ये विद्यापीठ पूर्णपणे अपयशी ठरल्याने काही प्राधिकरण सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला असता अधिकाऱ्यांकडून उलटसुलट उत्तरे व अरेरावीची भाषा वापरल्याची खंत ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. विद्यापीठ आपली चूक मानून ती दुरुस्त करायला तयार नसल्याने आता प्राधिकरण सदस्यांनीही विद्यापीठाविरोधात आवाज उठवला आहे.
विद्यापीठाची ज्या पद्धतीने परीक्षा सुरू आहे हे साफ चुकीचे आहे. परीक्षा प्रणालीत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खात्री विद्यापीठाने देणे आवश्यक आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अशा चुका झाकून नेणार नाही.
-विष्णू चांगदे, व्यवस्थापन परिषद सदस्य.