गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.., एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. असा जयघोष करीत घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे शहरातील विविध भागात विविध ठिकाणी डीजे व ढोलताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी आज सकाळपासूनच चितारओळीसह शहरातील विविध भागात गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

‘श्रीं’च्या आगमनाच्या निमित्ताने सकाळपासून शहरात उत्साहाचे वातावरण होते. महागाईचा परिणामही उत्सवावर कुठेही दिसून आला नाही. शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळाने रविवारी मिरवणुकीने गणरायाची मूर्ती घेऊन गेल्यानंतर आज सकाळी मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापना केली. सकाळपासून चितारओळीतून लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी केल्यानंतर ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत कोणी कारमध्ये, कोणी दुचाकी वाहनावर तर कोणी मोठय़ा वाहनांमध्ये गणपतीच्या मूर्ती घेऊन जात होते. गणपतीच्या मूर्ती सोबत मूषक, जानवे, गोफ आदी पूजेचे साहित्य खरेदी केले जात होते. एरवी गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पावसाचे आगमन होत असताना आज मात्र सकाळपासून उघाड होती. त्यामुळे चितारओळ गणेशभक्तांनी गर्दी फुलून गेली होती. ढोलताशांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला होता.भावसार चौकाकडून चितारओळीकडे येणारा मार्ग बंद केल्यामुळे गांधी पुतळा ते अग्रेसन चौक या मार्गावर गणपती नेण्यासाठी आणलेली वाहने ठेवण्यात आली होती. चितारओळमध्ये गणपतीची मूर्ती नेण्यासाठी लोकांची गर्दी झाल्यामुळे त्या परिसरातील मार्ग सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बडकस चौकात अनेक मोठी वाहने उभी केल्यामुळे दुपारनंतर या भागातील वाहतूक खंोळंबली होती. चितारओळशिवाय शहरात गोकुळपेठ, सक्करदरा, नंदनवन, पारडी, खामला चौक, प्रतापनगर, कमाल चौक, पारडी चौक, वाडी, मानकापूर, कोराडी, लक्ष्मीभूवन, त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर आदी भागात गणपतीच्या मूर्तींची दुकाने थाटली असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. पारडी परिसरात एच.बी. इस्टेटमध्ये विदर्भाचा राजा, रेशीमबागेत नागपूरचा राजा, पाताळेश्वर भागात महालचा राजा, कॉटेन मार्केट परिसरातील विदर्भ गणेश सार्वजनिक गणेश मंडळात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत राजे मुधोजी भोसले वाडय़ात व गांडल्याच्या वाडय़ात गणपतींची मूर्ती वाजत गाजत पालखीत नेण्यात आली. पांढराबोडी हिल टॉप परिसरातील एकता गणेश मंडळाची सर्वात उंच गणपतीची मूर्ती ढोलताशांच्या गजरात चितारओळीतून नेण्यात आली. अनेक सरकारी व खासगी कार्यालयात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

गणरायाच्या विधिवत प्राणपतिष्ठेसाठी लागणारे सामान, केळीचे खांब, कमळ, केवडा, दुर्वा शमीपत्र, पंचतत्री, पाट वस्त्र खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होती. चितारओळ, लालगंज, चिटणीस पार्क आणि गोकुळपेठ परिसरात आज गणेशभक्तांची अक्षरश: यात्रा भरल्याचे दिसून आले. गणपतीच्या आगमनाला कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून चितारओळसह शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील विविध भागातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असताना महापालिका प्रशासनाने आणि कंत्राटदरांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे शहरातील अनेक भागात गणपतींच्या मूर्ती नेताना अनेकांना शहरातील खड्डय़ांना सामोरे जावे लागले.

नियमांचे उल्लंघन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री करताना मूर्तीमागे लाल रंगाची खूण करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक विक्रेत्यांनी नियमाचे पालन केले नसल्याचे दिसून आले. चिटणीस पार्कमध्ये मातीच्या गणपतीच्या मूर्तीचे स्वतंत्र दालन सुरू केले होते. मात्र, त्या ठिकाणी फारशी गर्दी दिसली नाही. उलट चितारओळीत अनेक विक्रेत्यांनी अतिक्रमण करून मिळेल त्या जागी दुकाने थाटून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री केली असल्यामुळे स्थानिक मूर्तीकारांना त्याचा त्रास झाला. गपणतींच्या मोठय़ा मूर्ती चितारओळीतून बाहेर काढणे कठीण झाले होते. मूर्तीकार माहुरकर यांच्याकडे असलेली जयताळा भागातील १० ते १२ फुटाची गणपतींची मूर्ती चितारओळीतून बाहेर नेत असताना मूर्तीचा हात तुटला.