• महादेव जानकरांना परत पाठवले
  • फडणवीस, गडकरींविरुद्ध घोषणा

हलबांना अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी हलबा समाजाच्या भव्य मोर्चाने विधानभवनावर धडक दिली. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सामोरे यावे, अशी मागणी करीत मोर्चेकरी आक्रमक झाले होते. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भेटण्यास नकार दिल्याने त्यांना परत जावे लागले.

गेल्या अनेक वर्षांपासून हलबा समाजाचे त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सरकार त्याची दखल घेत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने या समाजाला आश्वासन दिले होते. मात्र, दोन्ही ठिकाणी सत्ता आल्यावरही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत.

त्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिम कृती समिती आणि राष्ट्रीय हलबा समाज मंडळाच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला. चिटणीस पार्कातून निघालेला मोर्चा टेकडी मार्गावर अडवण्यात आला. ‘आता नाही तर कधीच नाही’ अशा घोषणा देत मोर्चातील युवक आक्रमक झाले होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोर्चास्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी कठडे लावण्यात आले होते.

हलबा समाजाच्या नेत्यांनी सरकाच्या विरोधात रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निषेध केला. भाजप आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ आसई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. दरम्यान, खासदार विकास महात्मे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी मोर्चाला भेट दिली. महादेव जानकर सरकारच्यावतीने संबोधित करण्यासाठी गेले मात्र, मोर्चेक ऱ्यांनी ‘जो मंत्री धनगर समाजाला न्याय मिळवून देत नाही तर तो हलबा समाजाला न्याय काय देणार’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे जाणकरांना न बोलता व्यासपाठ सोडावे लागले.

दरम्यान, मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले शिष्टमंडळ लवकर आले नाही. त्यामुळे मोर्चातील काही युवक आक्रमक झाले आणि कठडे तोडून समोर येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव वाढला. समाजाचे नेते मोर्चेकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र, कार्यकर्ते मानायला तयार नव्हते. अखेर शिष्टमंडळ मोर्चास्थळी आले आणि विकास कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील आणि दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती दिली आणि आक्रमक झालेले मोर्चेकरी शांत झाले. यावेळी अ‍ॅड. नंदा पराते, प्रकाश निमजे, प्रवीण भिसीकर, नगरसेवक रमेश पुणेकर, राजेश घोडपागे आदी उपस्थित होते.

पक्ष, आमदारपद गेले खड्डय़ात -कुंभारे

पक्ष आणि आमदारपद गेले खड्डय़ात, समाज आणि समाजाचे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सरकारला आज मोर्चाच्या रूपाने इशारा देण्यात आला आहे. आश्वासनांवर समाजाचा विश्वास नाही. निवडणुकीच्या काळात समाजाने भरघोस मतदान करून भाजपला सत्ता मिळवून दिली आणि तीन महिन्यात समाजाचे प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, तीन वर्षे झाल्यावरही काही केले नाही. एका वर्षांत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आमदार आणि पक्षाचा राजीनामा देईल. हा मोर्चा म्हणजे सरकारला इशारा आहे आणि यापुढे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार विकास कुंभारे यांनी सांगितले.