हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री गेल्या तीन वर्षांपासून फक्त धमकी देण्याचेच काम करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी असली वक्तव्ये शोभून दिसत नाहीत. त्यांच्या धमकीला मी घाबरणारी नाही. त्यांनी अशा धमक्या देणे बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना उत्तर दिले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विविध मागण्यांसाठी व सरकारचा निषेध करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन केले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांविरोधात डल्लाबोल पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी मागील ३ वर्षे फक्त धमकी देण्याचेच काम केलं आहे. धमकी देण्यासाठी जो वेळ त्यांनी घेतला, तो सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी दिला तर त्यांचं तरी भलं होईल, असा टोला लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी असले शब्द शोभून दिसत नाहीत. धमक्या देणे बंद करा असे सुनावत मी असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे ठणकावून सांगितले.

अंगणवाडी सेविकांना भाऊबीज म्हणून २००० रूपये देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, अद्यापही या सरकारने त्यांना पैसे दिलेले नाहीत. चांगलं ते आपलं आणि वाईट हे विरोधकांचं, असं फडणवीसांचं झालं आहे. त्यांनी जबाबदारी घेण्याचं शिकावं. महिला म्हणून मी त्यांना न्याय मागते, असे त्या म्हणाल्या.

विरोधात असताना शेतकरी आत्महत्या केल्यानंतर फडणवीस हे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ३०२ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत. आता ३०२ कलम कोणावर लावायचा, मुख्यमंत्री की उद्धव ठाकरे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.