नितीन गडकरी यांची महापालिकेला सूचना

झोपडपट्टी मालकी हक्क पट्टे वाटपाचा विषय प्रलंबित ठेवू नका. मुख्यमंत्री आणि मला वेळ नाही. पट्टे वाटपासाठी आमची वाट पाहू नका, महापौर आणि संबंधित क्षेत्राचे आमदार यांच्या हस्ते पट्टे वाटप करा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला केली.

शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूर महापालिकेच्या डॉ. पंजाबराव स्मृती सभागृहात रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते. या बैठकीला महापौर नंदा जिचकार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर महापालिका नागरिकांना सेवा देण्यासाठी कुठला प्रस्ताव आणत असेल आणि त्यात रेल्वे अडसर ठरत असेल तर ते योग्य नाही. या कामासाठी रेल्वे विभागाने तातडीने नाहरकत द्यावे, असेही निर्देश त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या विकास आराखडय़ामधील रस्त्याच्या बांधकामातही रेल्वेने आडकाठी आणू नये. यासंदर्भात तातडीने निविदा काढण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

भट सभागृहात आर्ट गॅलरी

नागपूर शहरातील शिल्पकार, चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी निर्माण व्हावी, असा प्रस्ताव माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी प्रशासनाकडे दिला होता. या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. कविवर्य सुरेश भट सभागृहात अशा कलावंतांसाठी आर्ट गॅलरी तयार करण्याचे निर्देश  नितीन गडकरी यांनी दिले. या आर्ट गॅलरीसाठी ५०० रुपये असे नाममात्र शुल्क आयोजकांकडून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

बसला सीएनजी किट लावा, तोटा टाळा

शहरातील ‘आपली बस’ चालवताना येत असलेल्या अडचणीवरही तातडीने मार्ग काढण्यात यावे. शहर बस वाहतुकीचा तोटा महिन्याकाठी सात कोटींचा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी ४०० बसेसला सीएनजी कीट लावण्याची सूचना गडकरी यांनी केली. प्रवासी तिकिटापोटी दररोज जमा होणारा पैसा हा संबंधित ऑपरेटरच्या खात्यात जमा करण्यासोबतच बस डेपोसाठी ज्या जागा राखीव आहेत त्या जागांवर ‘बस पोर्ट’चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.