नागपूर : महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यूची लागण झाल्यानंतर २४ तासांत उपनेते बाल्या बोरकर यांच्या मुलालाही डेंग्यूचे निदान झाले. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा डेंग्यू नियंत्रणासाठी सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. नगरसेवकांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडत आहेत. शिवाय दरदिवशी नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांत दहशत पसरली आहे.

शहरातील विविध भागात डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या बघता  गुरुवारी नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले होते. दोन आठवडय़ापूर्वी पूर्व नागपुरात तपासणी दरम्यान दोन नगरसेवकांच्या घरी डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. मात्र, नाव जाहीर करण्यात आले नव्हते. महापालिकेतील सत्तापक्ष नेते व लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांची मुलगी मानसी हिला डेंग्यू झाल्याचे बुधवारी निदान झाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. लगेच दुसऱ्या दिवशी महापालिकेतील उपनेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांचा १२ वर्षीय मुलगा वेदांतची चाचणीही पॉझिटिव्ह आल्याने शहराला डेंग्यूच्या डासांनी विळखा घट्ट केल्याचे चित्र आहे. तीन दिवसांपूर्वी वेदांत टय़ुशन क्?लासेसमधून आल्यानंतर आजारी पडला. नियमित डॉक्?टरकडे तपासणी केली, त्यांनी त्याला व्हायरल ताप आल्याचे सांगितले. मात्र, काल अधिकच ताप चढल्याने वेदांतच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. आज चाचणीतून वेदांतला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्याचे पुढे येताच बोरकर कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले असून त्याला दाखल करण्यात आले आहे.

महापालिकेच्या साथ रोग विभागाने शहरात १३४८ संशयित रुग्ण असून १०५ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्याने दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असून संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात आल्याची भयावह स्थिती आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या सुरक्षा रक्षकाला डेंग्यू

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे चंद्रपुरातील सुरक्षा रक्षक चंदनकुमार (३०) यांना डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आजाराने अहिर यांच्या कार्यालय व परिसराला विळखा घातल्याचे निदर्शनास येताच तेथील ४० जणांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तर महापालिकेच्या वतीने दोन दिवसांपासून या परिसरात सफाई अभियान व फॉगिंग मशीनद्वारे धूळ फवारणी आणि औषध फवारणी करण्यात आली आहे.