जनआक्रोश संस्थेचा उपक्रम

नागपूर : वाहनांमुळे वायू प्रदूषणच नाही तर ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रामुख्याने शहरात नागरिकांना एकाचवेळी वाहनांमुळे वायू प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जनआक्रोश या संस्थेच्यावतीने फे ब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला ‘नो हॉर्न डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीला जनप्रबोधनाद्वारे शिस्तीचे वळण लावण्याचा  प्रयत्न करणाऱ्या या संस्थेने आता हा नवीन उपक्र म सुरू केला आहे.

ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आहेत. वाहनांचा आवाज, कारखान्यातील यंत्रांचा आवाज, लग्नसोहळ्यातील बँडच्या आवाजामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. त्यासोबतच दूरचित्रवाणी संच, रेडिओचा आवाज, भ्रमणध्वनीवर होणारे आवाज यामुळे स्वत:सह इतरांनाही मानसिक, शारीरिक त्रास होऊन आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जास्त आवाजाच्या संपर्कात आल्यामुळे अनेक लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे. सामान्य माणसाची आवाज ऐकण्याची क्षमता ८० डेसिबल असते आणि यापेक्षा अधिक आवाज झाल्यास डोके  दुखणे, अनिद्रा, चिडचिड होऊ शकते. हाच आवाज १४० डेसिबलपर्यंत पोहोचल्यास कानाचे विकार होऊन बहिरेपणाही येतो. लहान मुलांना देखील ध्वनी प्रदूषणाचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे वाहनांचा हॉर्न आवश्यक असेल तरच वाजवा आणि सामाजिक बांधीलकी या नात्याने जनजागृती करून इतरांनाही सांगा, असे आवाहन जनआक्रोश या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.