शहरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या मूळ आराखडय़ात कोणतीही तरतूद नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्राणिसंग्रहालयात ‘गोंडवाना थीम पार्क’ची घोषणा केली. मात्र, ही घोषणा म्हणजे नामकरणावरून आदिवासींमध्ये उफाळलेला असंतोष शांत करण्यासाठी ऐनवेळी उचललेले पाऊल असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, प्राणिसंग्रहालयात ‘थीम पार्क’ का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या नामकरणावरून आदिवासींमध्ये प्रचंड असंतोष आहे. या प्राणी उद्यानाचा पहिला टप्पा असलेल्या भारतीय सफारीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी उपराजधानीत आले होते. त्यामुळे नागपूर व परिसरातील सुमारे ४०० आदिवासींनी विधानभवन चौकातील बख्त बुलंदशहा यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. नामकरणाचा आदेश निघाल्यापासूनच रोज आदिवासी समाजाने विविध मार्गाने निषेध नोंदवला. निषेधाचा सूर कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘गोंडवाना थीम पार्क’च्या रूपाने आदिवासींची बोळवण करण्याचा प्रयत्न शासनाने केला.

मुळातच या प्रकल्पाच्या आराखडय़ात आतापर्यंत अनेकदा बदल करण्यात आले. अंतिम बदलानंतर प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू झाले आणि प्रकल्प मार्गी लागला. मात्र, आता ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे प्रकल्पाचा आराखडा तयार करणारा चमूही अवाक झाला आहे.

आराखडय़ात पुन्हा बदल

‘गोंडवाना थीम पार्क’साठी मूळ आराखडय़ात कोणतीही तरतूद नव्हती. भारतीय सफारीच्या उद्घाटन सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता आराखडय़ात पुन्हा बदल करून प्राणिसंग्रहालयात हे उद्यान कोणत्या ठिकाणी तयार करता येईल, ते कशा पद्धतीचे राहील, त्यासाठी किती खर्च लागेल याचा नव्याने विचार करावा लागेल, असे या प्राणिसंग्रहालयाचा बृहृत आराखडा तयार करणारे वास्तुविशारद अशफाक अहमद यांनी सांगितले.

वाद का?

नागपुरातील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला आदिवासींची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ही जागा म्हणजे गोंड राजाच्या काळात आदिवासींचे निवासस्थान होते. या राजाच्या काळातील सीतागोंडीन या स्त्रीने गोरेवाडा तलावाची निर्मिती केली. गोरेवाडा निसर्ग पायवाटेत आदिवासींच्या दोन देवांची मंदिरे आहेत.  त्यामुळेच आदिवासींनी या प्राणिसंग्रहालयाला गोंडवन हे नाव देण्याची मागणी केली आहे.

अडथळ्यांची मालिका..

* तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी सिंगापूर येथील बर्नाड हॅरिसन अँड कंपनीकडून आराखडा तयार केला. तो सुमारे हजार कोटी रुपयापर्यंत जात असल्याने ते काम तेथेच थांबले. त्यानंतर अशफाक अहमद यांच्याकडून आराखडा तयार करण्यात आला.

* त्यातही अनेकदा बदल झाले आणि पीपीपी तत्त्वावर प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरले. वनविकास महामंडळ आणि एस्सेल समूहाची संयुक्त कंपनी तयार करण्यात आली. एस्सेल समूहाने पुन्हा सिंगापूरच्या बर्नाड हॅरिसनला नियुक्त केले. मात्र, येथेही प्रकल्पाचे घोडे अडले. त्यानंतर एस्सेल समूहानेच यातून माघार घेतली आणि पुन्हा प्रकल्पाची जबाबदारी अशफाक अहमद यांच्याकडे सोपवण्यात आली.