कुठे वेळ देऊनही लस संपल्याचा फलक; कुठे राजकारण्यांच्या ‘चमकोगिरी’चा फटका

नागपूर : कधी राजकारण्यांकडून तर कधी प्रशासनाकडून लसीकरणाच्या नावावर नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. शहरात गुरुवारीही त्याचे विदारक दर्शन घडले. शहरातील अनेक केंद्रांवर १८ वर्षांवरील युवकांना वेळ देऊनही लस मिळाली नाही तर तिकडे छाप्रूनगरात महापौरांच्या प्रतीक्षेत उद्घाटनासाठी चक्क लसीकरण थांबवण्यात आले.

१८ वर्षांवरील युवकांसाठी केंद्र सरकारने एक मेपासून लसीकरणसुरू केले असले तरी लस टंचाईमुळे त्यांना वेळोवेळी केंद्रावरून परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लसीसाठी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतरही लस मिळण्याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. अठरा वर्षांवरील युवकांना लस घ्यायची असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात

घेता अनेक युवकांनी तातडीने संकेतस्थळावर नोंदणी केली. काही दिवसांनी त्यांच्या मोबाईलवर लसीकरण केंद्राचे नाव आणि कोणत्या वेळी जायचे याबाबत संदेश प्राप्त होतो.  दिलेल्या वेळेत युवक संबंधित केंद्रावर लसीकरणासाठी जातात. मात्र केंद्रावर गेले असता तेथे त्यांना लस उपलब्ध नाही, असे सांगून परत पाठवले जाते. असा अनुभव या आठवडय़ात अनेक युवकांना आला. धरमपेठ भागात राहणाऱ्या एका युवकाला नोंदणीनंतर सेव्हनस्टार रुग्णालयात लसीकरणासाठी वेळ देण्यात आली. युवक तेथे गेल्यावर या रुग्णालयाला यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याने त्याच्याकडील एसएमएस दाखवला, पण रुग्णालयाने असमर्थता व्यक्त केली.

दुसरीकडे महापालिकेने युवकांसाठी काही केंद्रांवर लसीकरणाची सुविधा केली. तेथे त्यांची वेगळी पद्धत आहे. केंद्रांना मिळालेल्या लससाठय़ाच्याआधारावर ते टोकन वाटप करतात. त्यावर वेळ दिलेली असते. त्यावेळेत जाऊन युवकांना लस घ्यायची असते, पण येथेही अडचणी आहेत. अनेकदा वेळेपूर्वीच लससाठा संपलेला असतो व युवकांना  परत पाठवले जाते. महापालिकेच्या गांधीनगर येथील रुग्णालयात असा अनुभव काही युवकांना आला. त्यांनी रुग्णालयात जाऊन टोकन घेतले. त्यांना चार वाजताची वेळ देण्यात आली होती. त्यावेळेत संबंधित युवक तेथे गेले असता लस संपल्याचे  सांगण्यात आले. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर टोकन वाटले जात असले तरी नगरसेवक, सत्ताधारी पक्षाचे नेते किंवा डॉक्टर्स किंवा इतर परिचितांच्या माध्यमातून अनेक जण मध्येच शिरून लस टोचून घेतात. त्यामुळे नियमानुसार टोकन घेणाऱ्यांसाठी लस शिल्लक राहात नाही. एकूणच युवकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत सुसूत्रता नसल्याचे दिसून आले आहे.