युद्ध सुरु नसतानाही देशाच्या सीमेवर जवान शहीद होत आहेत याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवन यांनी गुरुवारी दु:ख व्यक्त केले. आपण आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असे भागवत म्हणाले. ते नागपूर येथे प्रहार समाज जागृती संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. स्वातंत्र्यानंतर युद्धाच्या प्रसंगात प्राणांचे बलिदान द्यावे लागते. पण आपल्या देशात युद्ध सुरु नसतानाही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असे भागवत म्हणाले.

युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का शहीद व्हावे ? पण हे घडत आहे. हे रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला पावले उचलावी लागतील आणि पुन्हा आपल्या देशाला महान बनवावे लागेल असे भागवत म्हणाले.

गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात देशाचा विकास झाला नाही असे नाही. मात्र भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेल्या जपान आणि इस्रायल या देशांप्रमाणे आपण प्रगती करु शकलो नाही. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नाही. समाज म्हणून प्रत्येकाने विकास आणि देशरक्षणासाठी काम केले तर एक दिवस भारत विश्वगुरु बनेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

इस्रायलवर सातत्याने हल्ले झाले. मात्र तरी देखील वाळवंटात तो देश उभा राहिला. आज इस्रायलकडे कोणाची डोळे वाकडे करुन पहायची हिंमत नाही. दुसरीकडे जपानने दुसऱ्या महायुद्धातील विध्वंसानंतर नव्याने सुरुवात केली. आज जपान प्रगत देश आहे. भारताला सुजलाम- सुफलाम् भूमी लाभली, गुणवान लोकांची येथे खाण आहे. मात्र तरी देखील आपण हवा तसा विकास करु शकलो नाही. मात्र येणारा काळ देशाच्या प्रगतीचाच असेल.