शहरात मेट्रो, शहर बस धावणार नाहीच

नागपूर : मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच घेतला असतानाही मंगळवारी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची अधिसूचना इंग्रजीतून जारी केली.  दरम्यान, जुलै महिन्यातही शहरातील मेट्रो व शहर बसवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

मराठी सक्तीबाबत कालच राज्य सरकारने आदेश जारी केले होते. मात्र  टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची अधिसूचनाही सचिवांनी इंग्रजीत काढली होती. त्याचीच री आज जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी ओढली. त्यामुळे मराठी सक्तीबाबत प्रशासन किती गंभीर आहे याची प्रचिती येते.

दरम्यान, राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेत मेट्रो आणि शहर बससेवा यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यातही या सेवांपासून नागपूरकर वंचित राहणार आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून मेट्रो आणि शहर बससेवा बंद आहे. आंतर जिल्हा बससेवा सुरू असली तरी शहरात प्रवेश नाही.

मधल्या काळात टाळेबंदीत शिथिलतेनंतर बाजारपेठा आणि इतर दुकाने सुरू झाली. बाजारपेठेत वर्दळही वाढली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज भासू लागली. आवश्यक ती काळजी घेऊन मेट्रो सुरू करण्याची तयारी महामेट्रोने यापूर्वीच दाखवली होती. महापालिकेच्या परिवहन विभागानेही आयुक्तांना शहर बससेवा सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. अनलॉक-टप्पा वन पूर्ण झाल्यावर या दोन्ही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांना सरकार परवानगी देईल, असा अंदाज होता पण तो फोल ठरला.