प्रकल्पाबाबत १५ दिवसात दिल्लीत बैठक;  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाबाबत येत्या १५ दिवसात जलशक्ती मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक होणार असून कामात निष्काळजीपणा आणि हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शिफारस आपण करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर निवासस्थानी प्रकल्पाच्या कामाचा आढावा गडकरी यांनी गुरुवारी घेतला. प्रशासकीय उदासीनता आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे प्रकल्पाची कामे रेंगाळत आहेत. एकाच कामाच्या निविदा वारंवार रद्द करणे व काढणे हे प्रकार बंद झाले पाहिजे.

तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. भूसंपादन, पुनर्वसन अजून बरेच शिल्लक आहे. बुडित क्षेत्रासाठी करावयाच्या सुमारे दीडशे हेक्टर भूसंपादनासह एकूण ४९५ हेक्टर भूसंपादन प्रलंबित आहे.

केंद्रीय जलसंसाधन व गंगा पुनर्वसन मंत्री असताना स्वत: पुढाकार घेऊन मी केंद्र शासनाच्या वतीने मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतरही वेळोवेळी आढावा घेऊन या प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे असा प्रयत्न मी केला. परंतु या प्रकल्पाला होत असलेला विलंब पाहून व्यथित झालो आहे. मंजूर असलेल्या पण प्रलंबित राहिलेल्या कामांच्या निविदा तात्काळ काढून कामे वेगाने पूर्ण होतील, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश गडकरी यांनी या बैठकीत दिले.

या प्रकल्पासंदर्भातील दिल्लीतील बैठकीसाठी केंद्र आणि महाराष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येईल. राष्ट्रीय प्रकल्पाचा निधी दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वळता केला जाऊ  शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांना गडकरी यांनी दूरध्वनी केला आणि गोसेखुर्द प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन व अन्य प्रलंबित कामांना गती देण्याची सूचना केली.