* चाचण्यांची संख्या मर्यादित का?  *  २४ तासांत ४४ मृत्यू  * १,००२ नवीन बाधितांची भर

नागपूर :  रोज मोठय़ा संख्येने करोनाग्रस्त वाढत असताना सोमवारी  केवळ ४ हजार ६३३ संशयितांच्याच नमुन्यांचा चाचणी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे  केवळ १ हजार २ इतकेच नवीन बाधित शोधता आले. याशिवाय २४ तासात ४४ मृत्यू नोंदवले गेले.

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने  चाचणींची संख्या दैनिक नऊ हजारापर्यंत नेली आहे. परंतु ही संख्या आणखी वाढण्याची गरज आहे. परंतु आज सोमवारी जिल्ह्य़ात केवळ ४ हजार ६३३ चाचण्या नोंदवल्या गेल्या. त्यात शहरातील २ हजार ३९७ आरटी पीसीआर, ३ हजार ८९७ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे.  ग्रामीणमध्ये ८२ आरटीपीसीआर, ७३७ रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या.

यामध्ये १ हजार २ जणांना करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यात शहरातील ६७०, ग्रामीणच्या ३२९, जिल्ह्य़ाबाहेरील ३ जणांचा समावेश होता. गेल्या २४ तासांत शहरात ३०, ग्रामीण ११ तर जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, शहरात चाचण्यांची संख्या सोमवारी अचानक निम्म्यावर का आली, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी रॅपिड अँटिजन किट्सचा तुटवडा नसल्याचा दावा करत चाचण्या कमी झाल्याबद्दल मात्र काही ठोस कारण सांगितले नाही.

साडेसहा हजार बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार

जिल्ह्य़ातील ६ हजार ५७५ करोना बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. तर ३ हजार ५२७ जण जिल्ह्य़ातील विविध शासकीय व खासगी संवर्गातील कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयांतील जोखमेतील रुग्णांपैकी अनेकांना ऑक्सिजन कर काहींना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू आहे. नवीन बाधितांमुळे जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार १०४ वर पोहचली आहे.

करोनामुक्तांची संख्या ४० हजार पार

जिल्ह्य़ात रोज बाधितांची संख्या वाढत असतांनाच करोनामुक्तांचीही संख्या वाढत आहे. सोमवारी शहरात १ हजार २७२ तर ग्रामीणमध्ये २४६ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ४० हजार ६६७ वर गेली आहे. त्यात शहरातील ३२ हजार ९९६, ग्रामीणचे ७ हजार ६७१ जणांचा समावेश आहे.

विदर्भातील (१४ सप्टेंबर २०२०) मृत्यूसंख्या

जिल्हा                    मृत्यू

नागपूर                ४४

वर्धा                    ०७

चंद्रपूर                ०७

गडचिरोली          ०४

यवतमाळ          ०९

अमरावती          ०६

अकोला              ०५

बुलढाणा            ००

वाशीम              ०१

गोंदिया              ०२

भंडारा                ०८

एकूण                ९३