20 September 2020

News Flash

वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी किती दिवस?

गेल्या काही वर्षांपासून वर्धा मार्गावर सुरू असणारी वाहतूक कोंडी अद्याप संपायची चिन्हे दिसत नाहीत.

वर्धा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी.

विमानतळाकडील पर्यायी रस्ता रात्री बंद

गेल्या काही वर्षांपासून वर्धा मार्गावर सुरू असणारी वाहतूक कोंडी अद्याप संपायची चिन्हे दिसत नाहीत. आता मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत्रपती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एकेरी वाहतूक बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वे काम अंतिम टप्प्यात असून साईमंदिर ते विमानतळादरम्यान उड्डाणपुलावर दोन्ही बाजूने गर्डर टाकण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील एकेरी वाहतूक रात्री  बंद करण्यात येते. वर्धा मार्गावरील वाहनांसाठी आता खामला ते सहकारनगर स्मशानघाटाजवळून विमानतळ परिसराच्या आतून पर्यायी रस्ता दुरुस्त करून त्या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घाटापासून थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारावर रस्ता निघतो.  मात्र, विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता रात्री १० वाजेनंतर बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहनांना वर्धा मार्गाशिवाय पर्याय राहात नाही. पण, रात्री या मार्गावर उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू केले जात असल्याने मेट्रोचे कर्मचारी वाहतूक रोखून धरतात.

याचा प्रचंड मन:स्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतो. तीन वर्षांपासून शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गावर सुरळीत वाहतूक करता येत नसून खड्डय़ांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वाहनचालकांना मन:स्ताप

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकांकडून  पर्यायी रस्त्याचा वापर केला जातो. रात्रीला अनेकजण अजनी चौकापासून खामला चौक, खामला बाजारकडून पर्यायी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात, पण रात्री रस्त्याचे प्रवेशद्वार विमानतळ सुरक्षा व्यवस्थेकडून बंद करण्यात येते. त्यामुळे अनेकांना परत छत्रपती चौकात यावे लागते. अन्यथा जयप्रकाशनगरच्या आतून उज्ज्वलनगर परिसरातून वर्धा मार्गावर यावे लागते. तर वध्रेकडून नागपूरच्या दिशेने येणारी अनेक वाहने रात्री विमानतळाच्या प्रवेशद्वाराने खामला बाजारकडे येण्याचा प्रयत्न करतात. पण, सहकारनगर घाटाजवळील प्रवेशद्वार बंद राहतो व त्यांना पुन्हा यू-टर्न घेऊन तीन किमी मागे जावे लागते.

– प्रमोद कारेमोरे, रहिवासी जयप्रकाशनगर.

रात्री एकेरी वाहतूक

दिवसभर वर्धा मार्गावरील वाहतूक सुरळीत असते. वाहतूक पोलिसांच्या परवानगीनुसार रात्री ११ ते ५ यादरम्यान एका मार्गाची वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजूंची वाहतूक करण्यात येते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोकडून सर्व उपाय योजण्यात येत असून वाहनचालकांना दिशा दाखवण्यासाठी स्वयंसेवकही रस्त्यांवर उपलब्ध असतात.

– अखिलेश हळवे,  मेट्रो उपमहाव्यवस्थापक, जनसंपर्क

सीताबर्डीतील स्थिती धोकादायक

सीताबर्डी परिसरातही मेट्रो रेल्वेचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र बँक चौकात चारही बाजूने खोदकाम व बांधकाम सुरू आहे. मेट्रो इमारतीच्या पिल्लरच्या खालून वाहतूक सुरू असून त्या ठिकाणी  दिवसाही  मोठा अंधार असतो. मेट्रोला सर्व सुरक्षितता बाळगणे आवश्यक असून तेथे एखादा अपघात झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. तर दुसरीकडे महाराष्ट्र बँकेकडून झांशी राणी चौकाच्या दिशेने उभारण्यात येणारे मेट्रो पिल्लरमुळे झांशी राणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यात भरीस भर म्हणून ऑटोचालकांची मनमानी तेथे सुरू असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:10 am

Web Title: optional road at the nagpaur airport closed at night
Next Stories
1 विमानतळ विकासाची संधी कोणाला ?
2 हुक्का पार्लर चालकांचा आता ग्रामीण भागाकडे मोर्चा
3 महापालिकेत विद्यार्थ्यांच्या मासिक पास योजनेत घोटाळा
Just Now!
X