शहरातील गर्दीपासून लांब विवाह सोहळ्याचे आयोजन

विवाह हा सर्वाच्या जीवनातील अतिमहत्त्वाचा क्षण असतो आणि म्हणूनच तो अविस्मरणीय व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हल्ली विवाह समारंभ हा एक ‘इव्हेंट’ झाला आहे. त्यामुळे शहरातील वर्दळ, कलकलाटापासून दूर शांत व निसर्गरम्य वातावरणात अर्थात ‘वेडिंग डेस्टिनेशन’ आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सध्या शहरात रुजू लागला असून राजकीय नेते, व्यावसायिक आणि इतरही श्रीमंत कुटुंबांच्या विवाह समारंभासाठी  अशा स्थळांची मागणी वाढू लागली आहे.

पूर्वी विवाह समारंभासाठी राहते घरच योग्य ठिकाण मानले जात होते. कालांतराने जागा आणि सुविधांचा अभाव यामुळे मंगल कार्यालयांचा पर्याय पुढे आला. बिछायत केंद्राला मंडप आणि सजावटीचे काम देण्यात यायचे. तसेच आचारी बोलवून भोजनाचा मेन्यू ठरवला जायचा. घरातील सर्व मंडळी  व्यस्त राहायची. काळानुरूप यातही बदल होत गेले.  यात होणारी लक्षावधी रुपयांची उलाढाल बघून या क्षेत्रातील व्यावसायिकांनी विवाहाला समारंभाचे स्वरूप  दिले.  मंगल कार्यालयातून विवाह सोहळा थेट हॉटेलात पोहचला. शहराच्या तारांकित हॉटेलात विवाह सोहळा साजरा करणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले.  मात्र आता त्याहीपलीकडे जाऊन शहरापासून दूर शांत ठिकाणांची निवड यासाठी केली जात आहे.  वेडिंग डेस्टिनेशनमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये, यासाठी इव्हेंट कंपन्यांना नेमले जात आहे. अगदी लग्नाच्या पत्रिकेपासून तर दोन्ही वऱ्हाडांसाठी वाहनांची, राहण्याची, भोजनाची विशेष काळजी घेण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. अतिशय कल्पकतेने आणि बारकाईने उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून लग्नाची पंचतारांकित सोय होत आहे. यासाठी शहराबाहेरच्या प्रत्येक मार्गावर वेिडग डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहेत.

बँकांकडून ‘वेडिंग लोन’

मुंबई, जयपूर, गोवा, हैदराबादच नाही तर विवाह सोहळा साजरा करण्यासाठी नागपूरकर विदेशात देखील जात आहेत. थायलंड, बँकॉक आणि दुबईला विशेष पसंती लाभत आहे. सध्या विविध बँका विवाह सोहळ्यासाठी विशेष कर्ज देत असल्याने विदेशात विवाह  करण्याची संख्या वाढली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक हे कर्ज देत आहेत.

नागपूरबाहेर असलेली प्रसिद्ध विवाह स्थळे

सुराबर्डी (अमरावती मार्ग)

चोकरधानी (अमरावती मार्ग)

छत्तरपूर फार्म (उमरेड मार्ग)

दि ग्रॅण्ड भगवती (कामठी मार्ग)

एम्प्रेस पॅलेस (वर्धा मार्ग)

लांबा सेलिब्रेशन (कामठी मार्ग)

सर्वकाही वेळापत्रकानुसार

वेडिंग डेस्टिनेशनमध्ये सहभागी वऱ्हाडय़ांना विवाह समारंभाच्या वेळापत्रकाचे तपशील दिले जाते. यामध्ये दोन ते तीन दिवस आयोजित कार्यक्रमांचा आणि विधीचा वेळ, त्याचे ठिकाण आणि उपस्थितांनी त्यावेळी कोणते कपडे घालावेत याच्या सूचना दिलेल्या असतात. त्याशिवाय नृत्य प्रकरामध्ये विशेष आमंत्रित असलेल्या बॅण्डचा उल्लेख त्यात केलेला असतो. सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या विशेष पार्टीची सर्व माहिती त्यामध्ये असते.