शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी सोडत; प्रेरणा कॉन्व्हेंटमध्ये सर्वात जास्त १,२२५ ऑनलाईन अर्ज
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत नागपुरातील रेशीमबागेतील प्रेरणा कॉन्व्हेंटमध्ये सर्वात जास्त १,२२५ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून ३० जागांसाठी एवढे अर्ज आल्याने मंगळवारी काढण्यात आलेल्या ‘सोडत’ कार्यक्रमात या शाळेचा विशेष नामोल्लेख करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांमध्येही शिक्षणविषयक कमालीची जागरुकता यावेळी दिसून आली.
बी.आर. मुंडले शाळेत सकाळी सोडतीचा कार्यक्रम मुंडले सभागृहात आमदार नागो गाणार, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी आणि प्राथमिक शिक्षणाचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. साधारणत: मध्यमवर्गीय पालक आणि कॉन्व्हेंट संस्कृती असलेल्या पालकांमध्ये शिक्षणाविषय जागृती जास्त असते असे म्हटले जाते. मात्र, ‘आरटीइ’ अंतर्गत प्रवेश मिळावा या आशेवर सोडतीसाठी आलेल्या पालकांची एकच गर्दी उसळली होती. पाल्याला चांगल्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत होती.लहान मुले असल्याने ७० टक्के महिला पालकांनी सभागृहात धाव घेतली होती. त्यातील अनेक महिलांनी कामाला दांडी मारून मुलांच्या शिक्षणाच्या कामाला प्राधान्य दिल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.सोडत कार्यक्रमात नागपूर जिल्हा आणि शहरात सर्वात जास्त ऑनलाईन अर्ज याच शाळेसाठी आले आहेत. गेल्या दोन वर्षांपेक्षाही यावर्षी शाळेला तिपटीने अर्ज आले असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये ही शाळा चांगलीच प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. ‘आरटीई’मध्ये त्या भागातील केवळ एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे असल्याने एवढय़ा मोठय़ा संख्येने अर्ज करणाऱ्या बहुतेक पालकांच्या पाल्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता मावळली आहे.
बालकांनी ० ते ९ अंक निवडले. चारदा एकूण ४० अंक निवडण्यात आले. पहिली चिट्ठी आमदार नागो गाणार यांनी उचलली त्यानंतर ३९ बालकांना चिट्ठी काढण्याची संधी देण्यात आली. अशा रितीने ‘मॅट्रिक्स’ पूर्ण केले. सहा हा अंक नऊ सारखा दिसू नये म्हणून चिठ्ठय़ांवर अक्षरीही लिहायला लावले. महाराष्ट्र लॉटरीची सोडतीची पद्धत याठिकाणी उपयोगात आणली आहे. पहिली, दुसरा आणि तिसरा क्रमांक बालकांनी चिट्ठीद्वारे काढला. त्यांनाच वाचायला लावले. काहींनी चुकीचेही वाचले. तेव्हा सभागृहात त्या चिट्ठय़ा सर्वाना दाखवण्यात आल्या. नंतर बालकांनी काढलेला अंक स्क्रिनवर दाखवण्यात आला. पालकांना त्याचे छायाचित्र काढायला सांगितले. पुण्याच्या राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत शाळानिहाय विद्यार्थी निवड प्रक्रियेची पुढील कार्यवाही केली जाईल. प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या पाल्याच्या पालकांना लघुसंदेशाद्वारे माहिती कळवली जाईल.
अध्यक्षीय भाषणात नागो गाणार म्हणाले, राज्यघटनेने गरिबांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. २०१०पासून कायदा लागू केला. प्रवेश देण्याच्या पद्धतीबद्दल वारंवार टीका, टीप्पणी, आरोप, गैरप्रकार, भ्रष्टाचार झाले.
प्रत्येकवर्षी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता ही प्रक्रिया मान्य करण्यात आली. या प्रक्रियेचा पाया महाराष्ट्र लॉटरीची निवड प्रक्रिया ठरवण्यात आली. ज्याचा क्रमांक लागेल तो प्रक्रियेला चांगलेच म्हणेल आणि ज्याचा लागणार नाही, तो कदाचित दोष देईल.
‘लॉटरी लॉजिक’ प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी सांगितले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश थोटे आणि संगीता तभाने यांनी केले.
‘आरटीई’ कृती समिती अध्यक्ष शाहीद शरीफ आणि अर्चना भोयर यावेळी उपस्थित होते.
मुंडले विद्यालयात सोडत
एकूण १३,६४० ऑनलाईन अर्ज
एकूण ७,४१० जागा
प्रवेश बिंदू पूर्व प्राथमिक आणि पहिली
सर्वात जास्त अर्ज प्रेरणा कॉन्व्हेंटसाठी
अल्प उत्पन्न गटातील पालकांमध्ये कमालीची जागरुकता
पुढील आठवडय़ात प्रवेशितांची यादी जाहीर होण्याची शक्यता

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शिक्षणाधिकऱ्यांच्या निर्देशानुसार पहिलीच्या केवळ ३० जागांवर प्रवेश करायचे आहेत. तेही एक किलोमीटरवर राहणाऱ्या पाल्यांचेच. मात्र, सात-आठ किलोमीटरवर राहणाऱ्या पालकांनाही शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अपेक्षा आहे. गेल्यावर्षी ४५०च्या जवळपास अर्ज आले होते. यावेळी मात्र, सर्व प्रक्रियाच ऑनलाईन असून शिक्षण विभागाने पाठवलेल्या यादीनुसारच प्रवेश करावे लागणार आहेत.
-प्रेरणा कॉन्व्हेंटच्या, मुख्याध्यापक आशा थॉमस