कॅनडाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता

नागपूर : बनावट दस्तावेजाच्या आधारावर पासपोर्ट तयार करून विदेशात मुले पाठवण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी पुन्हा एका इसमाला  दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. मानसिंग दिलीपसिंग मुलतानी (६२) रा. बाबा बुद्धाजीनगैर असे आरोपीचे नाव आहे. मानसिंगने दोघांचे बनावट पासपोर्ट तयार करून त्यांना विदेशात पाठवले आहे.

बनावट पासपोर्ट तयार करून विदेशात मुले पाठवण्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने २१ जानेवारी २०१८ ला उघडकीस आणला होता. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र अटवाल, गुरुमित अटवाल, रुलडासिंग गुज्जर, परमित गुज्जर, जर्नलसिंग, सुरिंदर सिंग, पियारासिंग, जसविंदरसिंग कौर, सतवीरसिंग धोतरा, परमजित धोतरा, मनजितसिंग धोतरा, कुलजीत धोतरा, निशांत सिंग, सतवंत सिंग, काश्मीर सिंग, मनजीत सिंग, अजितसिंग, निर्मल सिंग, बलबिरसिंग मुलतानी आणि जसविंदर कौर मुलतानी यांच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हे दाखल केले. तपासादरम्यान आरोपींनी २००७ पासून इतरांची मुले स्वत:ची  दाखवण्यासाठी बनावट शालेय व इतर दस्तावेज तयार केले. त्या आधारावर त्यांचे पासपोर्ट तयार करून ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयातून ‘सिझन व्हीसा’ घेतला. त्यानंतर त्या मुलांना स्वत:ची मुले म्हणून इंग्लंडमध्ये नेत असत व तेथे त्यांना सोडून ते दाम्पत्य भारतात परतायचे. पुन्हा काही दिवसांनी अशाच प्रकारे दुसऱ्या मुलाला घेऊन जायचे. अशाप्रकारे आतापर्यंत या दाम्पत्यांनी एकूण ६२ मुलांना इंग्लंडमध्ये नेले. त्यातील काही तरुण भारतात परतले. मात्र, उर्वरित तरुण अद्याप परतले नाहीत. ब्रिटिश शासनाने त्यांचा शोध घेतला असता ते भेटले नाहीत. त्यामुळे दिल्लीला उच्चायुक्त कार्यालयाने सप्टेंबर २०१७ ला नागपूर पोलिसांना पत्र पाठवून प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. तपासादरम्यान मानसिंगचेही नाव समोर आले. मात्र, तो तेव्हापासून फरार होता. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचा नागपूरसह पंजाबमध्ये शोध घेतला. मात्र, तो सापडला नव्हता. शेवटी त्याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’नोटीस सर्व विमानतळांना पाठवली होती. दरम्यान, चार दिवसांपूर्वी आरोपी हा दिल्ली विमानतळावरून कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात होता. विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व नागपूर पोलिसांना कळवले. त्यानंतर नागपूर पोलीस दिल्लाीला गेले व त्याला ताब्यात घेऊन नागपुरात परतले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

२३ जणांविरुद्ध दोषारोपपत्र

आरोपीचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी २३ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.

      – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.