मेडिकलच्या कोविड रुग्णालयातील आकस्मिक विभाग बंद

नागपूर : मुंबई, पुणेच्या धर्तीवर मानधनात वाढ, विमा कवचसह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून मेडिकल आणि मेयोतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मंगळवारपासून बेमुदत संपावर गेल्याने येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली. आंदोलनामुळे मेडिकलच्या कोविड रुग्णालयातील आकस्मिक विभाग बंद करत तो औषधशास्त्र विभागाच्या आकस्मिक विभागात वर्ग करण्यात आला. या धक्कादायक निर्णयाने गैरकरोनाच्या रुग्णांना विषाणूचा संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या आंदोलनात मेडिकलचे २००, मेयोतील १५० असे एकूण ३५० डॉक्टर सहभागी झाले होते. सध्या नागपुरात करोनाचा उद्रेक सुरू आहे. मेडिकलमध्ये सध्या सुमारे ९०० खाटा  तर मेयोत सहाशे खाटा आहेत. या तुलनेत दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  बाधित असलेले वॉर्ड हाऊसफुल्ल आहेत. सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्युटी करोना वॉर्डात लावण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांच्या हाताखाली प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेवा देतात. रात्रकालीन सेवेसाठी हेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर कर्तव्यावर असतात. मात्र ते संपावर गेल्याने  निवासी तसेच वरिष्ठ डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे.

दोन्ही रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप फेटाळून लावत रुग्णसेवेवर या आंदोलनाचा परिणाम झाला नसल्याचा दावा केला आहे. या  डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालय परिसरात गोळा होत शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शन केली. त्यात राज्यभरातील शासकीय वैôकीय महाविद्यलयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी एकच नियम लागू करावा, सर्वांचे मानधन वाढवण्यात यावे, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे प्रतिनिधी शुभम नागरे यांनी केली.