काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रफुल्ल पटेल यांचा टोला

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यापेक्षा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्या विधानाला आम्ही जास्त महत्त्व देतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पटोले यांना टोला लगावला.

पटेल यांनी आज शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगत आहे, असे विचारले असता पटेल  म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्षविस्तार करण्याचे स्वातंत्र आहे.  कोणी काय बोलावे आणि त्यावर आम्ही वारंवार उत्तर द्यावे, हे योग्य नाही. यासंदर्भात आमचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

आम्ही महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देतो. कारण, ते पक्षश्रेष्ठींचे प्रतिनिधीत्व करतात. शिवाय एच.के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली. यातून त्यांनी योग्य तो इशारा संबंधितांना दिला आहे, याकडेही पटेलांनी लक्ष वेधले. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत.  त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार चालले आहे. महाविकास आघाडीला शरद पवारांचे मार्गदर्शन मिळत आहे. पुढेही मिळत राहीलच. बाकीचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही, असेही पटेल म्हणाले. सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळांवरील नियुक्ती ठरलेल्या सूत्रानुसार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार रस्ते, दोन मेट्रो म्हणजे विकास नव्हे !

चार रस्ते आणि दोन मेट्रो मार्गिका बनल्याने शहराचा विकास होत नसतो तर उद्योगधंदे सुरू होऊन तरुणांच्या हाताला काम द्यावे लागते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नितीन गडकरी यांच्यावर केली. राष्ट्रवादी शहर काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा वर्धमान नगरातील परंपरा लॉन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.  पटेल  म्हणाले, गडकरी यांनी मिहानसाठी यशवंत स्टेडियम येथे ५० हजार लोकांना बोलावले होते. त्यावेळी त्यांनी मिहानध्ये अमुक करू, तमुक करू, युवकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्याचे आज काय झाले, ते आपण बघत आहोत.  मिहानमध्ये एकही नवीन उद्योग आला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  राष्ट्रवादी काँग्रेस नागपुरात आजवर दुय्यम भूमिकेत राहिला. पक्ष महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत अग्रेसर भूमिकेत नव्हता. पण, आता तसे होणार नाही. नागपूर-विदर्भात राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे, असेही पटेल म्हणाले.