कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचे दुर्लक्ष; हातमोजे, मास्क देणे बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठरवून दिलेल्या प्रमाणाने कीटकनाशकाची फवारणी करूनही किडी तात्काळ रोखल्या जात नसल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी अतिजहाल कीटकनाशक वापरण्यास सुरुवात केली, मात्र ते वापरताना शेतमजुराला मास्क, हाजमोजे देखील दिले जात नाहीत. उत्पादन कंपन्यांनीच हे मास्क, हातमोजे देण्याचे बंद केले आहे.

पारंपरिक पिकांचे उत्पादन कमी होत असल्याने बीटी बियाण्यांचा वापर वाढला. त्याचे उत्पादनही वाढले, परंतु अलीकडे या पिकांवर देखील मोठय़ा प्रमाणात किडीचा प्रार्दुभाव होऊ लागला आहे. त्यासाठी अधिक जहाल कीटकनाशक बाजारात आली आहेत. मात्र, एवढे विषारी कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत कीटकनाशकांसोबत दिले जाणारे हातमोजे, मास्क देणे बंद केले आहे. या कीटकनाशकांच्या डब्याचे झाकण जरी उघडे केल्यास आजूबाजूला असह्य़ उग्र दर्प येऊ लागतो. शेतमजूर तर दिवसभर उन्हात, उपाशीपोटी फवारणी करतो. त्याच्या श्वसनातून शरीरात, डोळ्यात गेल्याशिवाय राहणार आहे. यावेळी पऱ्हाटीची झाडे अधिक उंच आहेत. त्याचा परिणाम अधिक जाणवत आहे, असे कृषी केंद्राचे संचालक आणि कीटकनाशक डीलर असोसिएशनचे अभिजीत काशीकर म्हणाले.

कंपन्या कीटकनाशकासोबत मास्क, हाजमोजे देत होत्या. परंतु अलीकडे कंपन्यांनी ते देणे बंद केले आहे. शेतकरी हे साहित्य वेगळे घेण्याच्या मानसिकतेत नसतो. शिवाय शेतमजुराला आपण विषारी कीटकनाशक हाताळत असून त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होईल, याची जाणीव नसल्याने असले प्रकार घडले आहेत. यासाठी अनेकदा कंपन्यांचे प्रतिनिधी, कीटकनाशक विक्रेते आणि शेतकरी देखील जबाबदार असतात. कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा कीटकनाशक विक्रेते शेतकऱ्यांना त्या कीटकनाशकाबद्दल माहिती देतात. त्याचे प्रमाण समजावून सांगतात. हे विष असल्याचे शेतकऱ्यांना ठाऊक असते. परंतु शेतमजुराला याच्या तीव्रतेची कल्पना नसते. शेतकरी द्रावण तयार करून देते आणि शेतमजूर उपाशीपोटी, उन्हात फवारणी करत असतो. यंदा झाडांची उंची पाच ते सहा फूट असल्याने फवारणी नवीन पद्धतीच्या पॉवर पम्पने किंवा बॅटरीवर चालणाऱ्या पम्पने केली जात आहे. शेतकरी विक्रेत्यांना महिनाभर कीड यायला नको, असे अतिजहाल कीटकनाशक द्या, अशी मागणी करतात. माल खपवायची आलेली संधी तो कसा काय सोडणार. विक्रेतेदेखील कधी डोसचे प्रमाणही वाढवण्याची सूचना करतात आणि ते शेतकरी अनेकदा मान्य करतात.

वेगवेळ्या किडीसाठी, रोगांसाठी वेगवेगळे कीटकनाशक फवारणी न करता शेजमुजरी वाचवण्यासाठी दोन-तीन कीटकनाशकांचे द्रावण एकत्र करून फवारणी करतात. कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा विक्रेते कीटकनाशक आणि पाणी याचे प्रमाण प्रति एकर असे सांगतात. प्रत्यक्षात शेतकरी फवारणी पंपाच्या क्षमतेनुसार द्रावण तयार करीत असतात.

किटकनाशक उत्पादक कंपन्यांनी मास्क, हातमोजे उपलब्ध करणेअनिवार्य नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई शक्य नाही. कृषी निरीक्षक नियमितपणे किटकनाशकांची तपासणी करत असतात.  -पद्मा गोडघाटे, विभागीय सहसंचालक (अतिरिक्त कार्यभार), नागपूर</strong>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People death due to pesticide poisoning in maharashtra
First published on: 06-10-2017 at 01:32 IST