महेश बोकडे

गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्के घट; टाळेबंदीच्या काळात ८० टक्के पालकांचे दुर्लक्ष

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लहान मुलांच्या लसीकरणाचा टक्का २ टक्क्यांनी घसरला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. खासगी रुग्णालयात मुलांचे लसीकरण करणाऱ्या ८० टक्के पालकांनी कडक टाळेबंदीच्या काळात  लसीकरणाकडे दुर्लक्ष केले, असेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

प्रगत मुंबईपासून मागासलेल्या गडचिरोलीपर्यंतची आकडेवारी बघितली तर १ एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत राज्यात १९ लाख ३२ हजार ५५५ मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. त्यातील पन्नास टक्केच मुलांचे लसीकरण झाले. १ एप्रिल २०२० ते सप्टेंबर २० दरम्यान राज्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४८ टक्केच लसीकरण झाले. ते गेल्यावर्षीहून २ टक्के कमी आहे. गेल्या दोन महिन्यात स्थिती सुधारल्याने ही संख्या सुस्थितीत पोहचली. परंतु  मार्चमध्ये टाळेबंदी लागल्यावर सुमारे चार ते पाच महिने लसीकरणाचा आलेख खूप खाली गेला होता.

खासगी रुग्णालयांबाबत माहिती देताना कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डिसॅबिलिटी (कोमहाड)चे आंतराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर म्हणाले,  टाळेबंदी काळात व त्यानंतरही पालक मुलांना लसीकरणासाठी आणायला घाबरत होते. त्यामुळे चार ते पाच महिने लसीकरणाची टक्केवारी ८० टक्क्यांनी घसरली होती. परिणामी, मुलांना  पोलिओ, निमोनिया, गोवरसह इतर आजारांचा धोका वाढला होता. आता  करोनाच्या दुसऱ्या संभावित लाटेतही मुलांच्या लसीकरणावर लक्ष देणे आवश्यक आहे.

या विषयावर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.  नागपूर आणि अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या भागात अशीच स्थिती असल्याचे नाव न टाकण्याच्या अटीवर मान्य केले.

सात शहरे, जिल्हे ५० टक्क्यांखाली

१ एप्रिल २०२० ते सप्टेंबर २० या कालावधीत राज्यातील मुंबई बीएमसी (मुंबई) (२७ टक्के), नागपूर (४१ टक्के), यवतमाळ (४९ टक्के), अमरावती (४६ टक्के), अकोला (४८ टक्के), पुणे (३५ टक्के), पालघर (४९ टक्के) या शहर किंवा जिल्ह्य़ात  लसीकरण कमी झाले.  मात्र रायगड (६१ टक्के), नंदुरबार (५९ टक्के), रत्नागिरी (४९ टक्के), गडचिरोली (५५ टक्के) येथे चांगले लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

करोनापूर्वी खासगी व शासकीय रुग्णालयांत ८० टक्के मुले विविध आजारांची तर २० टक्के मुले विविध लसीकरणासाठी येत होती. परंतु कडक टाळेबंदीच्या चार ते पाच महिन्यांत ८० टक्के मुले लसीकरणाला आली नाहीत. आता स्थिती सुधारली आहे. काही भागात रुग्ण जास्त असल्यास तेथे स्थिती वेगळी असू शकते.

– डॉ. उदय बोधनकर, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, कोमहाड.