नागपूर : करोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा आजार होताना दिसत आहे. परिणामी, या आजारावर प्रभावी ठरणाऱ्या अ‍ॅम्फोटोरीसीन बी या इंजेक्शनचाही तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धेतील जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनीला हे इंजेक्शन बनवण्याची परवानगी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळवून दिली असून येथे पंधरा दिवसांत या इंजेक्शनची निर्मिती सुरू होईल.

करोनातून बरे झालेल्या व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार दिसत आहे. असे रुग्ण वाढल्याने या आजारावर प्रभावी अ‍ॅम्फोटोरीसीन बी या इंजेक्शनचाही तुटवडा सुरू झाला आहे. हे इंजेक्शनही अवाच्या सवा दरात खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, वर्धेतील जेनेटिक लाइफ सायन्सेसकडून या इंजेक्शनच्याही उत्पादनाबाबतचा प्रस्ताव राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आला होता. गडकरी यांच्या प्रयत्नाने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

येत्या पंधरा दिवसांत निर्मिती सुरू होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या बाजारात या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये असून जेनेटिक लाइफ सायन्सेस ते फक्त बाराशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. वर्धेत दर दिवशी २० हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने अ‍ॅम्फोटोरीसीन बी इंजेक्शन निर्मितीला मंजुरी दिल्याने तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष निर्मिती सुरू होईल. – डॉ. महेंद्र क्षीरसागर, व्यवस्थापैकीय संचालक, जेनेटिक लाइफ सायन्सेस, वर्धा.