अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जागेचा प्रश्न सुटणार

नागपूर पोलीस आयुक्तालयाकडे शहराच्या परिसरात २४ एकर जागा असेल, असे आजवर कुणाला माहीतही नव्हते. मात्र, अडगळीत पडलेली मौल्यवान वस्तू हाती लागावी, तसे नागपूर पोलिसांना शहराच्या हद्दीत २४ एकर जागा सापडली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसंदर्भात भेडसावणारा जागेचा प्रश्न या २४ एकर जागेमुळे सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१९७० मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयासाठी दाभा येथे खसरा क्रमांक-१६८ मध्ये ९ हेक्टर ३४ आर (जवळपास २४ एकर) जमीन राज्य सरकारने नागपूर पोलिसांना दिली होती. त्यावेळी नागपूर शहराचा एवढा विकास झालेला नव्हता. त्यामुळे दाभा परिसरात जंगल होते. ही जागा शहरापासून बऱ्याच अंतरावर असल्याने ग्रामीण पोलीस मुख्यालयासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यात आला आणि ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय पाटणकर चौकात हलविण्यात आले. त्यानंतर ही जागा पोलीस अधिकाऱ्यांच्या विस्मरणात गेली. १९७० पासून आजतागायत नागपूर पोलिसांकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जमीन असल्याची माहिती कुणालाही नव्हती.

शहरात पोलीस दलात सहा हजारांवर अधिकारी व कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आवश्यक निवासस्थाने उपलब्ध नाहीत. जे निवासी संकुल आहेत, ते अतिशय छोटय़ा आकाराची असून शहराच्या बहुबाजूला विखुरलेल्या स्वरुपात आहेत. तर, हजारो पोलीस कर्मचारी आजही भाडय़ाच्या घरांमध्ये राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासाकरिता चांगल्या वसाहती निर्माण करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नवीन वसाहती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून शहर पोलिसांतर्फे जागा शोधण्यात येत होती. अशात रिंगरोड परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गिट्टीखदान पोलीस दाभा परिसरात चौकी तयार करण्याच्या विचारात होते, परंतु चौकीसाठी त्यांना जागा मिळत नव्हती. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र निकम यांनी स्थानिक लोकांशी संपर्क केला. त्यावेळी दाभा परिसरातील रहिवासी असलेल्या एका प्रौढ व्यक्तीने त्यांना दुसऱ्यासमोर हात पसरण्याची गरज नसून, दाभा परिसरात पोलीस दलाची जमीन असल्याचे सांगितले. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी तलाठी कार्यालयाकडून दस्तावेज पडताळणी केली असता ती जमीन नागपूर पोलिसांच्या मालकीची असल्याचे ७/१२ च्या उताऱ्यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर निकम यांनी आपल्या वरिष्ठांना जमिनीसंदर्भात माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सहआयुक्त राजवर्धन, मुख्यालय पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे आणि अनेक अधिकाऱ्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली असल्याची माहिती आहे. निवासी वसाहत, कार्यालयांसाठी मदत पोलीस दलात निरंतर अधिकाऱ्यांची बदली होत असते. त्यामुळे ही जमीन विस्मरणात गेली होती. परंतु दस्तावेजांची पडताळणी

केली तेव्हा एवढय़ा मोठय़ा

प्रमाणात आपल्याकडेच जागा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. पाहणी केल्यानंतर तलाठी कार्यालयामार्फत जागेची मोजणी करण्यात येत आहे. या जमिनीसंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पंरतु त्या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासी वसाहत आणि इतर कार्यालये स्थापन करण्यासाठी मोठी मदत होईल.

– राजवर्धन, पोलीस सहआयुक्त