संगणक परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चातील परिचालक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. आठ ते दहा हजार परिचालकांचा समावेश असलेल्या मोर्चामध्ये पळापळ झाल्याने शंभराहून अधिकजण जखमी झाले. त्यात चारजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेयोच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार पोलिसांसह काही युवतींचा समावेश आहे. मोर्चा परिसरात रस्त्यावर रक्ताचे डाग आणि सामान पडले होते. सकाळी १० वाजतानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता होती.
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा विविध मागण्यांसाठी मंगळवारी विधानभवनावर मोर्चा धडकला. सायंकाळी काही परिचालकांनी कठडे तोडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तीन परिचालकांना ताब्यात घेण्यात आले. परिचालक रात्रभर मोर्चास्थळी बसून होते. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्वासनाने मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले नाही. रात्रभर बसलेले असताना सरकार काहीच दखल घेत नसल्याने परिचालकांनी सकाळी घोषणा देणे सुरू केले आणि मोर्चेकरी आक्रमक झआले. त्यांनी जाळपोळ सुरू करून कठडय़ाची फेकाफेक केली. पोलीस शांत राहण्याचे आवाहन करीत होते. पोलिसांच्या दिशेने कठडे भिरकावल्याने जमावाला पांगविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आदेश देताच पोलिसांनी लाठीमार सुरू केला. मोर्चेकऱ्यांची पळापळ झाली. राज्य राखीव दलातील पोलीस जो दिसेल त्याला मार देत होते. पोलिसांनी महिला परिचालकांवर लाठीमार सुरू केला. त्यात अनेक युवती जखमी झाल्या. गल्लीत जाऊन पोलीस परिचालकांना मारत होते. त्या ठिकाणी रक्त सांडले होते. कोणाच्या डोक्याला तर हात पायाला मार बसला. या लाठीमारामध्ये अनेक परिचालक बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ मेयो रुग्णालयात हलविले जात होते.
आंदोलकांवर पाण्याचा मारा करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रस्त्यावर अनेकांच्या चपला, कुणाच्या बॅग पडल्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीवर, हात, पायावर जबर मार बसला. अनेकांच्या सामानाची फेकाफेक करण्यात आली. मोबाईल तोडण्यात आले. जखमींना मेयो रुग्णालयात हलविले जात होते. पोलिसांनी मेडिकल आणि मेयो रुग्णालयातून रुग्णवाहिकेची मागणी केली.
सकाळी ७.३० ते ८. १५ वाजताच्यादरम्यान हा प्रकार सुरू असताना पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना शांत केल्यानंतर पुन्हा सैरावरा पळालेले सर्व परिचालक मोर्चास्थळी आले. शंभरावर परिचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.९९जखमींना मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामध्ये चार पोलिसांचा समावेश होता. त्यातील १८ जखमींना दाखल करण्यात आले. तिघांचे हाड तुटले असून एकाच्या डोळ्याला इजा पोहोचली आहे. १४ जणावर शस्त्रक्रिया विभागात उपचार करण्यात आले. पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मोर्चेकऱ्यांना शांत केले.
शंभरावर जखमी, चारजण गंभीर
जखमींमध्ये चार पोलीस व युवती

लाठीमारातील जखमींना मेयो रुग्णालयात नेले जात होते. त्यामुळे रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात गर्दी वाढली. तेथे रुग्णांचा आक्रोश बघायला मिळाला. अनेक युवक आणि युवती गंभीर असल्यामुळे त्यांना वार्डात आणि अतिविशेष कक्षात हलविले जात होते. अनेकांची रडारड सुरू होती. मेयोची बाहेरची दारे बंद करण्यात आली होती. प्रसार माध्यमांना आत प्रवेश दिला जात नव्हता. काहींना प्राणवायू लावण्यात आला. विभागात डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यामुळे सूचना देण्यात आल्यानंतर दहा निवासी डॉक्टरांना बोलविण्यात आले.