मंजुरी नसताना बजाजनगर ठाण्याचे बांधकाम

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसावर असताना त्यांच्याकडून नियम खुंटीला टांगून ठेवले जात असल्याचा प्रकार बजाजनगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीबाबतीत वारंवार समोर येत आहे. या इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाशिवायच पूर्ण करण्यात आल्याने उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे ही इमारत वादात सापडली असून नवीन आलेले अधिकारीही त्या इमारतीचा विषय टाळत आहेत.

धंतोली, अंबाझरी आणि राणाप्रतानगर यांची विभागणी करून बजाजनगर पोलीस ठाण्याचे निर्माण करण्यात आले. ठाण्याचा कारभार सध्या किरायाच्या बंगल्यातून सुरू आहे. मात्र, दीक्षाभूमी चौकातील संत चोखामेळा वसतिगृहाच्या इमारतीच्या बाजुला या ठाण्याची नवीन इमारत बांधण्यात आली. या जागेचे मालकी हक्क नागपूर सुधार प्रन्यासकडे आहे. पोलिसांनी गेल्या आठवडय़ात नासुप्रसोबत ३ कोटी ५० लाख रुपयांमध्ये जागेचा २५ वर्षांसाठी भाडेपट्टा केला. मात्र, भाडेपट्टा होण्यापूर्वीच व महापालिकेकडून बांधकामाचा नकाश मंजूर न करताच बांधकाम पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत बांधकामावर २ कोटी १० लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, भाडेपट्टा गेल्या आठवडय़ात झालेला असताना महापालिकेने २०१३ पासून पोलीस विभागाकडे जागेसाठी ७५ लाख रुपये कर थकबाकी काढली. ही इमारत आधीच वादात सापडली असल्याने उद्घाटन रखडले आहे. अशात आता पोलीस ठाण्याचा फलक लागला असून त्यावर एका ड्रायव्हींग स्कूलची जाहिरात करण्यात येत आहे. या विषयावर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या इमारतीच्या फाईलचा अभ्यास करून योग्य ती प्रतिक्रिया देता येईल. आतापर्यंत आपण फाईल बघितली नसल्याचे स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांचा अततायीपणा नडला

पूर्वीच्या  अधिकाऱ्यांनी मुलभूत सुविधा निर्माण करण्याच्या ओघात नियम डावलून सर्रासपणे बांधकाम सुरू केले.अधिकाऱ्यांनी दाखवलेला अततायीपणा आता नागपूर पोलिसांना भोवला आहे.