विधान परिषदेसाठी उमेदवार निवडीचा मुद्दा
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारीच्या मुद्दय़ावरून भाजपमध्ये गडकरी व फडणवीस समर्थकांमध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. समर्थकांच्या रस्सीखेचीत कुणाची सरशी होते, यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या या मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक करीत आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघात भाजपच्या मतदारांची संख्या जास्त असताना सुध्दा मुळक भाजपचे अशोक मानकर यांचा निसटता पराभव करून निवडून आले होते. यावेळी राज्यात सत्ता व मतदारसंघात बहुमत अशा अनुकूल वातावरणाचा फायदा मिळेल हे गृहीत धरून भाजपमधील इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी उमेदवार निवडीच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात शेवटपर्यंत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोटातून नगरसेवक गिरीश देशमुख व संदीप जोशी यांची नावे समोर करण्यात येत आहेत. गेल्यावेळी पराभूत झालेले मानकर गडकरी समर्थक होते. त्यामुळे यावेळी फडणवीस समर्थकाला संधी हवी असा युक्तिवाद सध्या केला जात आहे. गडकरी गटाकडून महापौर प्रवीण दटके व पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची नावे समोर करण्यात येत आहेत. दटके हे तरुण आहेत तर व्यास यांना विधानसभेची उमेदवारी देता आली नाही, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे भाग आहे, असा युक्तिवाद या गटाकडून करण्यात येत आहे.

फडणवीस व गडकरी यांच्यात उघड वाद नसले तरी सत्तेत आल्यावर या दोघांच्याही समर्थकांनी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील याची काळजी आजवर घेतली आहे. त्यामुळेच यावेळी निवडणूक निकालापेक्षा उमेदवाराची निवडच अधिक चर्चेचा विषय ठरली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांविरुध्द उभे ठाकले होते. तेव्हा शेवटच्या क्षणी गडकरी गटाची सरशी झाली व अनिल सोले आमदार झाले. आता मात्र फडणवीसांच्या म्हणण्याला प्राधान्य देऊन पक्षात समतोल साधावा, असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांच्या गोटातून करण्यात येत आहे. देशमुख व जोशी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्यापैकी एकाला संधी मिळाली तर मुख्यमंत्र्यांना उपराजधानीत पहिला समर्थक आमदार मिळेल, असा तर्क पक्षाच्या पातळीवर मांडला जात आहे. येथील पक्षाचे सर्व आमदार गडकरीसमर्थक म्हणून ओळखले जातात. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन फडणवीसांच्या गटातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे वर्तुळ या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भाजपमधील वाद अखेपर्यंत शमले नाही तर गेल्यावेळप्रमाणे यावेळीही फायदा उचलण्याचे डावपेच आखले जात आहेत. या वादाचा लाभ मिळावा म्हणून राजेंद्र मुळक अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात.