लघु उद्योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये आपसात समन्वय राहत नसल्यामुळे अनेक योजना अंमलात आणण्यासाठी अडचणी येत असतात, अशी खंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. रेशीमबाग मैदानावर सुरू  असलेल्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्यानिमित्ताने सुरेश भट सभागृहात विदर्भातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचा कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला संधी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सक्ष्म, लघु उद्योग विभागाचे नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार, मत्स्य विभागाचे अधिकारी सागर मेहरा, गिरीश गांधी, सी.डी. मायी, रमेश मोत्तल, डॉ. अनुघा सुरभी आदी अधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योजनांबाबत आराखडा तयार करून शेतकरी व छोटे उद्योग करणाऱ्या युवकांचे मेळावे घ्यावे. मत्स्य, बांबू, हनी, फ्लॅश आदी उद्योगांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. परंतु त्या ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाही. विशेषत:

लघु उद्योगांचा कृषी विभागाला काय उपयोग होऊ शकतो, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. विदर्भात उद्योगांना चालना मिळण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे.  राज्यात १३ क्लस्टरला मंजुरी देण्यात आली असून त्यातील काही विदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले. पार्लेवार यांनी सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योगाची माहिती दिली.

कार्यशाळेत दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन

दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर गोठा हवेशीर आणि स्वच्छ ठेवा, असा  संदेश या क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. अ‍ॅग्रो व्हिजन अंतर्गत आयोजित डेअरी विषयातील कार्यशाळेत हा विषय शेतकऱ्यांपुढे मांडण्यात आला. या कार्यशाळेत डॉ. एस.के. साहतपुरे, डॉ. सदाशिव चोपडे, डॉ. अतुल ढोक, डॉ. के.एस. राठोड, डॉ. चेतक पंचभाई, डॉ. सारीपुत लांडगे, डॉ. सुनील रोकडे, सत्यजीत भोसले, डॉ. ऋचा लांजेवार आदींनी सहभाग घेतला. ‘कुक्कुटपालन व त्यातील संधी-जोखीम’ विषयावर डॉ. मुकुंद कदम व डॉ. पी. एल. पवार यांनी विचार व्यक्त केले. शेती फायद्याची व्हावी,  शेतकऱ्यांच्या हाती डॉलर यावे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी गटशेती करण्याचे आवाहन डॉ. भगवानराव कापसे यांनी गटशेतीवर आयोजित कार्यशाळेत केले.

शेतकऱ्यांनो, चिमण्या बनून उडू नका!

विदर्भ कणखर आहे, लवचिक किंवा कमजोर नाही. मी सुद्धा विदर्भाचीच आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी तळमळीने बोलते. शेतकऱ्यांनो, तुम्ही चिमण्या कावळे बनून उडू नका, थकू नका, थांबू नका तर आत्मविश्वासाने गरूड झेप घ्या, असा प्रेमाचा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी दिला. अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला सिंधूताईंनी सदिच्छा भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.  शासन, लालफितशाही आणि लहरी पाऊस या सगळ्याने पिचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आश्वासक हात म्हणजे अ‍ॅग्रोव्हिजन आहे.  शेतकऱ्यांचा प्रवास काटेरीच आहे पण, पाऊल उचला, पुढे जा आणि या संपूर्ण आयोजनाचा, इथे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा पूर्ण लाभ घ्या, असे त्या म्हणाल्या.