अनेकांचा राजीनामा; पदभार स्वीकारण्यासही नकार

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी रूजू होताच काही प्राध्यापक व अधिकाऱ्यांनी जणू असहकार पुकारला आहे. अर्थशास्त्र विभागाच्या डॉ. स्नेहा देशपांडे यांनी महत्त्वाच्या तीन पदांचा राजीनामा दिला तर अन्य काही विभाग प्रमुख पदभार स्वीकारण्यास कुलगुरूंना चक्क नकार देत आहेत. त्यामुळे विद्यापीठामध्ये कुलगुरू विरुद्ध प्राध्यापक-अधिकारी असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

कुलगुरू डॉ. चौधरी यांनी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारला. त्याच्या आठ दिवसातच डॉ. स्नेहा देशपांडे यांनी ‘नॅक समिती’, आयक्यूएसी प्रमुख आणि मानव्यशास्त्र विभागाच्या प्रमुख अशा महत्त्वाच्या तीन पदांचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे, त्यांनी वैयक्तिक कारणांनी पदांचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

डॉ. देशपांडे यांनी राजीनामा दिल्याने मानव्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांना पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनीही नकार दिला. याशिवाय अन्य विभागांमध्येही अशीच अवस्था  आहे.

मुळात कुलगुरूंनी आदेश दिल्यावर संबंधित प्राध्यापकांनी पदभार स्वीकारणे आवश्यकच असते. मात्र, विद्यापीठात कुलगुरूंच्या आदेशाचा अवमान करून त्यांना चक्क नकार देत अघोषित असहकार पुकारण्यात आल्याचे चित्र आहे. दीड वर्षांपासून विद्यापीठाचे  ‘नॅक ’चे मूल्यांकन रखडले आहे. करोनामुळे शिक्षणामध्ये नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. मात्र, अशा कठीण काळातही चारही शाखांच्या अधिष्ठातांचे पद रिक्त आहे. कु लगुरूंसोबतच्या या असहकारामुळे काही प्राध्यापकांना विविध पदांचा प्रभार सांभाळावा लागत आहे.

.. म्हणून नाराजीचा सूर

कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या निवडीवरूनही विद्यापीठातील एका गटामध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. चौधरी हे एका विशिष्ट गट आणि विचारधारेचे समर्थन करीत असल्याने त्यांच्याविरोधात काहींनी असहकार पुकारल्याचे चित्र विद्यापीठामध्ये असून एक नवा संघर्ष विद्यापीठामध्ये पाहायला मिळत आहे.

अनेकांना  ‘कारणे दाखवा’

कुलगुरूंच्या विविध आदेशांना प्राध्यापक, विभाग प्रमुख व काही अधिकारी जुमानत नसल्याने  कुलगुरू डॉ. चौधरी यांनी काही विभाग प्रमुख आणि उपकुलसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.