21 September 2020

News Flash

खासगी-सार्वजनिक भागिदारीतून नागपूर विमानतळ अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव

प्रस्तावित अद्यावत आणि अत्याधुनिक विमानतळ सुमारे ९०० हेक्टरमध्ये विकसित करण्यात येत आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

१४ जूनच्या निविदा पूर्व बैठकीत निर्णयाची शक्यता

सार्वजनिक – खासगी भागिदारीतून चार टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्याधुनिक आणि अद्ययावत करण्याचा प्रस्ताव असून, यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांचे खरे चित्र १४ जूनला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक अशी संकल्पना असलेल्या मिहान प्रकल्पात, मिहान इंडिया लि. ही कंपनी चालवित असलेल्या या विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. यासाठी जागतिक निविदा काढण्यात आली. या प्रकल्प डिझाईन, बांधा, वित्त पुरवठा, वापरा आणि हस्तांतरित करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर राबवला जाणार आहे. विमानतळाचे काम घेणाऱ्या कंपनीला विमानतळ अद्ययावत केल्यानंतर ते चालवायचे आहे, त्याची देशभाल दुरुस्तीचे काम स्वत:कडे ठेवायचे आहे. प्रस्तावित प्रकल्पानुसार दरवर्षी सुमारे ६.९३ दशलक्ष प्रवासी वाहतूक क्षमतेचे विमानतळ विकसित करायचे आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २.४ दशलक्ष प्रवासी क्षमतेच्या हिशेबाने विकास करावयाचा आहे.
हे विमानतळ चार टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३०० मीटरची दुसरी धावपट्टी आणि १,६९० मीटरचे समांतर टॅक्सी ट्रॅक बांधण्यात येणार आहे. तसेच नवीन एटीएस नियंत्रण टॉवर आणि एटीसी ब्लॉक उभारण्यात येईल. नवीन मुख्य अग्निशमन केंद्र आणि स्टॅटिक टँक अभारणे (क्षमता १.५ लाख लिटर), अतिरिक्त परिसराची संरक्षण भिंत, पॅसेंजर टर्मिनलची नवीन इमारत (क्षेत्रफळ ४३,२५० चौ.मी.), माल वाहतूक टर्मिनल (१,००० चौ.मी. क्षेत्रफळ आणि देशांर्तगत माल वाहतूक टर्मिनल १,६०० चौ.मी. क्षेत्रफळ), वीज केंद्र, वाहनतळ, रस्ता, संरक्षण भिंत, उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येईल.
यासाठी १,४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी नागपूरमध्ये १४ जूनला निविदा पूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रस्तावित विमानतळ ९०० हेक्टरमध्ये होणार
विद्यमान विमानतळाचे सुमारे ४०० हेक्टरमध्ये आहे. प्रस्तावित अद्यावत आणि अत्याधुनिक विमानतळ सुमारे ९०० हेक्टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. यासाठी सोनेगाव आणि आसपासच्या गावातील जमिनींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २३०० मीटरची दुसरी धावपट्टी आणि १,६९० मीटरचे समांतर टॅक्सी ट्रॅक बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यात टर्मिनल इमारतीचा विस्तार, विमानांसाठी अ‍ॅप्रोन तयार करणे, अभ्यांगतांसाठी कार आणि टॅक्सी वाहनतळाची व्यवस्था करणे. अतिविशिष्ट व्यक्तींच्या कारसाठी स्वतंत्र वाहनतळ विकसित करण्यात येईल. यासाठी २१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. तिसऱ्या टप्प्यात दुसऱ्या धावपट्टीचा विस्तार करण्यात येईल. ही धावपट्टी ८०० मीटर करण्यात येईल. दुसऱ्या धावपट्टीसाठी समांतर टँक्सी वे तयार कण्यात येईल. (४००० मीटर), आंतरराष्ट्रीय व देशांर्तगत माल वाहतूक टर्मिनल उभारण्यात येईल. यासाठी २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि चौथ्या टप्प्यात टर्मिनल इमारतीचा विस्तार, प्रवासी विमानसाठी अ‍ॅप्रॉन तयार करणे, बहुमजली चार चाकी वाहनतळ विकसित करण्यात येईल. त्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:07 am

Web Title: proposal for nagpur airport sophisticated
Next Stories
1 उपराजधानीत वन्यप्राणी दत्तक योजनेचा फज्जा
2 सायकिलगकडे वाढता ‘कल’
3 महापालिकेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकही गुच्छ घेऊन वाडय़ावर
Just Now!
X