नागपुरात मुख्यमंत्र्यांच्याही प्रभागात नाराजीचा झेंडा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्ष स्वयंसेवकांनीच बंडाचा झेंडा हाती घेतल्याने भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे. या स्वयंसेवकांना शांत करण्यासाठी भाजप नेत्यांनी संघाच्याच नेत्यांना साकडे घातले असून, बंडखोरी झालेल्या प्रभागांत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी संघनेत्यांवर टाकण्यात आली आहे.

नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर असल्याने येथील महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत असलेली सत्ता लक्षात घेऊन भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी होती. त्यात संघ स्वयंसेवकांचाही समावेश होता; मात्र पक्षाने काही प्रभागांत त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपच्याच उमेदवाराविरुद्ध बंड केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोरांच्या यादीत संघाचे चार स्वयंसेवक  असून १९ प्रभागांत संघ स्वयंसेवकांनी भाजपने दिलेल्या उमेदवाराविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नाराजीची ही व्याप्ती मोठी असल्याचे मानले जाते. संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागातही संघ स्वयंसेवकांचे बंड राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. महाल येथील संघाचे मुख्यालय असलेल्या परिसरातील प्रभाग १८, १९ आणि २२ या प्रभागांमध्ये संघ परिवारामध्ये भाजप उमेदवारांविरोधात मोठय़ा प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत आहे.

श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, संजय चिंचोले आणि विद्यमान नगरसेविका रश्मी फडणवीस या संघ परिवारातील स्वयंसेवकांना उमेदवारी न दिल्याने संघातील मंडळी नाराज आहेत. संघ स्वयंसेवक अतुल सेनाड यांनी तर मुख्यालय असलेल्या प्रभागातूनच  बहुजन समाज पक्षाची उमेदवारी घेतली आहे. या प्रचंड नाराजीचा निवडणुकीत फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन नाराजांना शांत करण्यासाठी नितीन गडकरी पुढे सरसावले होते; मात्र त्यात त्यांना यश न आल्याने बंडखोरांची समजूत काढण्यासाठी थेट संघालाच साकडे घालण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांनी रविवारी रात्री संघाच्या काही प्रमुख नेत्यांना बोलावून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि ज्या प्रभागात संघ स्वयंसेवक नाराज आहेत तेथील भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणण्याची जबाबदारी या नेत्यांवर टाकली. या प्रयत्नाला कितपत यश येते यावरच भाजपचे निवडणुकीतील यश-अपयश अवलंबून आहे.

नाराजी दूर केली जाईल

संघ परिवारातील स्वयंसेवक किंवा भाजपचा कार्यकर्ता अशा कुठलाही भेद भाजपमध्ये नाही. निवडून येण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे अशा उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमध्ये सगळेच संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते नाराज झाले असतील तर भाजपचे पदाधिकारी ती नाराजी दूर करतील. संघाच्या पदाधिकाऱ्यांची याबाबत कुठलीही बैठक झालेली नाही किंवा याबाबत कुणाला कसले आदेश दिलेले नाहीत.

सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष, भाजप

 

या स्वयंसेवकांच्या हाती बंडाचा झेंडा..

डॉ. अरविंद तलहा (प्रभाग ३३),  श्रीपाद रिसालदार (प्रभाग १९), विशाखा जोशी (प्रभाग १५), अतुल सेनाड (प्रभाग ३१) मुकुंद बापट (प्रभाग १७)

महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी संघाने भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांकडे शिफारस केली नाही आणि संघात तशी पद्धत नाही. संघात काम करताना अनेक स्वयंसेवक भाजपसह संघ परिवारातील विविध संघटनांत सामाजिक काम करतात. त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असू शकते. त्यांना समजवायला संघाचे पदाधिकारी जाणार नाहीत किंवा तशी विनंतीही भाजपने केली नाही. मात्र गडकरी यांच्या वाडय़ावर संघ स्वयंसेवकांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे समर्थन करता येणार नाही.

राजेश लोया, महानगर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर</strong>