राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

मराठा, धनगर आरक्षण, शिवाजी महाराजांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव आदी घोषणा म्हणजे गेल्या चार वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेचे सरकार पसरवलेल्या अफवा होत्या, असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केला. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परवा धुळे जिल्ह्यत अफवेमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले. ही घटना पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर सरकारने अफवा पसरवण्याचा धंदा आता बंद करावा. अन्यथा चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक या सरकारला झोडपून काढल्याशिवाय राहणार नाहीत.  सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यवी आणि खरीप हंगामासाठी त्यांना तातडीने कर्जपुरवठा करावा, शासकीय खरेदी न झालेल्या तुरीला २ हजार रूपये आणि हरभऱ्यालाा दीड हजार रूपयांचे प्रती क्विंटलअनुदान द्यावे, बोंडअळी आणि इतर नैसर्गिक आपत्तींसाठी घोषित केलेली मदत तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, अशा अनेक मागण्याही त्यांनी केल्या. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या वतीने धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना आज ५ लाख रूपयांची मदत करण्यात आली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश खोब्रागडे कुटुंबीयांना देण्यात आला.

मुहूर्त पाहून शुभकार्य घडत नाही

यंदाचे पावसाळी अधिवेशन सोमवारऐवजी बुधवारी सुरू करण्याच्या निर्णयावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला चिमटा काढला. ते म्हणाले, अधिवेशन बुधवारी सुरू करण्याचे औचित्य अजून तरी उमगलेले नाही. अशी चर्चा आहे की, सरकारने मुहूर्त पाहून हा निर्णय घेतला. मुहूर्तावर ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी. पण आमचे सरकारला एवढेच सांगणे आहे की, फक्त मुहूर्त पाहून शुभ कार्य घडत नाही तर त्यासाठी काम करावे लागते आणि इच्छाशक्तीही असावी लागते.

बिल्डरो के साथ, पक्षनिधीचा विकास

विकासकांना लाभ मिळावा यादृष्टीने मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपा पक्षनिधी गोळा करण्याच्या तयारीला लागला आहे.  हा विकास आराखडा म्हणजे ‘बिल्डरो का साथ, पक्षनिधीचा विकास’ या घोषणेशी सुसंगत आहे.

योग दिवसावरून सरकारवर व्यंगास्त्र

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी व्यंगचित्रांचे लक्षवेधी फलक लावण्यात आले होते.अलिकडेच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फिटनेस चॅलेंज’च्या आधारे राज्यातील ज्वलंत समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणारा व्यंगचित्रांचा एक फलक या ठिकाणी उभारण्यात आला होता. भाजपा-शिवसेना सरकारला फिटनेस चॅलेंजसारखे प्रसिद्धीचे स्टंट करता येतात. मात्र लोकांशी निगडित खरे आव्हान पेलताना हे सरकार उताणे पडले आहे. त्याचप्रमाणे योगदिनी काढलेल्या मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांच्या आधारेही सरकारवर बोचरी टीका करण्यात आली. ‘महाराष्ट्राचा दुर्भाग्ययोग’ असा मथळा असलेल्या या फलकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काही लक्षवेधी व्यंगचित्रे होती.